'आधारकार्डवरून बेकायदेशीर आर्थिक व्यवहार झाले आहेत' अशी ऑनलाइन पद्धतीने सांगून सायबर चोरट्यांनी ८२ वर्षीय सेवानिवृत्तास ३० लाखांचा गंडा घातला आहे.  Pudhari News Network
क्राईम डायरी

Online Arrest : ऑनलाइन अरेस्ट करीत सेवानिवृत्तास 30 लाखांचा गंडा

सायबर भामट्यांनी सर्वोच्च न्यायालयासह सीबीआय कार्यालयाचा दाखविला बनावट सेट

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : सायबर भामट्यांकडून वृद्धांना लुबाडण्याचे प्रकार सातत्याने समोर येत असून, आणखी असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 'आधारकार्डवरून बेकायदेशीर आर्थिक व्यवहार झाले आहेत' अशी ऑनलाइन पद्धतीने बतावणी करून सायबर चोरट्यांनी सिडकोतील एका ८२ वर्षीय सेवानिवृत्तास तब्बल ३० लाखांचा गंडा घातला आहे. भामट्यांनी विश्वास बसवा म्हणून सर्वोच्च न्यायालयासह सीबीआय कार्यालयाचा बनावट सेटही दाखविल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे.

सकाळी १० वाजता पैसे वर्ग केल्यावर दुपारी ३ वाजता वृद्धास संशय आला. त्याने जवळील बँक गाठून माहिती घेतली, तेव्हा फसवणूक झाल्याची जाणीव झाली. याबाबत शहर सायबर पाेलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, रक्कम 'हाेल्ड' करण्याची प्रक्रिया सुरूआहे. तक्रारदार हा खासगी कंपनीतून सेवानिवृत्त असून, त्यांची मुले व सुना बाहेरगावी नाेकरी करतात. ते सध्या पत्नीसह सिडकाेत वास्तव्यास आहे. दरम्यान, १७ ते २६ नाेव्हेंबर या कालावधीत सायबर चाेरट्यांनी त्यांना व्हाट्स ॲपवरुन व्हिडीओ काॅलद्वारे संपर्क केला. 'तुमच्या आधार कार्डवरुन अश्लिल मेसेज पाठविण्यात आले' आहेत. साेबतच नरेश गाेयल मनीलाॅन्ड्रिंग केसमधील आर्थिक गैरव्यवहारात तुमचे आधारकार्ड वापरण्यात आले असून, जप्त केलेले पैसे त्याच व्यवहारातील आहेत का? हे पडताळण्यासाठी तुमच्याकडील रक्कम पहावी लागेल, असे सांगितले.

दरम्यान, तक्रारदाराला विश्वास पटावा, यासाठी चाेरट्यांनी देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यासारखा पेहराव घालून बनावट सुनावणी घेतली व तशी बनावट कागदपत्रे, अटक वाॅरंट शेअर केले. यावरच न थांबता सीबीआय व ईडी मुख्यालयाचे बनावट कार्यालय व वर्दी घातलेले पाेलिस अधिकारी दाखवून अटकेची कारवाई केल्याचे सांगितले. त्यामुळे वृद्धाने ३० लाख रुपये संशयितांच्या बँक खात्यात वर्ग केले. त्यानंतर संशयितांनी संपर्क करणे बंद केले. सायबर पोलिस याप्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत.

नोटांवरील नंबर सारखा असल्याचा धाक

नरेश गाेयल केसमध्ये जप्त केलेले पैसे व तुमच्या खात्यात असलेल्या नाेटांवरील नंबर क्रमवारीनुसार व सारखे असल्याचा धाक दाखविला. त्यामुळे वृद्धाने विश्वास ठेवत औदार्य दाखविले. यानंतर पैसे वर्ग केले. मात्र, संबंधित संशयितांचे बँक खाते 'करंट' असल्याने त्यांनी हे पैसे काही मिनिटांत काढून इतर खात्यांवर वर्ग केल्याचे समाेर आले आहे. वृद्धाने बँकेतून माहिती घेतली असता फसवणूक झाल्याचे समाेर आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT