एकतर्फी प्रेमातून खून Pudhari News Network
क्राईम डायरी

One-sided Love Murder | नकार मिळाल्याने तिचा खून; एकतर्फी प्रेमातून युवकाची थरारक विकृती

हरसूल पोलिसांकडून 24 तासांत गुन्हा उघड; संशयित ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

त्र्यंबकेश्वर (नाशिक) : त्र्यंबक तालुक्यातील हरसूल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खरवळ पैकी वीरनगर शिवारात महिलेच्या खून प्रकरणाचा तपास हरसूल पोलिसांनी अवघ्या २४ तासांत लावून संशयित आरोपीला अटक केली आहे. एकतर्फी प्रेमातून हा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

गुरुवार (दि. २६) सायंकाळी साडेसातच्या सुमारास वैशाली नामदेव चव्हाण (४०, रा. वीरगाव) ही महिला जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला आढळून आली होती. तिला हरसूल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. सुरुवातीला पती नामदेव चव्हाण यांनी अपघाती मृत्यूची शक्यता व्यक्त केली, मात्र शवविच्छेदनानंतर खून झाल्याची खात्री झाली.

घटनास्थळ अत्यंत दुर्गम व पुराव्याशिवाय असल्याने तपासात अडथळे होते. मात्र, फिर्यादीत दिलेल्या वर्णनाच्या आधारे हरसूल पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर व पेठचे उपविभागीय पोलिस अधिकारी वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली तीन तपास पथके तयार करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार भगवान पांडुरंग शिंदे (३४, रा. पिंपळपाडा, ता. मोखाडा, जि. पालघर) हा इसम वर्णनाशी जुळणारा असून, घटनेच्या दिवशी त्या भागात दिसला होता. त्यास आडगाव शिवारातून ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने खुनाची कबुली दिली. संशयित शिंदे हा मयत वैशालीवर एकतर्फी प्रेम करीत होता. तिच्याकडून नकार मिळाल्यानंतर आणि शिवीगाळ व चापटी मारल्याच्या रागातून त्याने लाकडी दांड्याने डोक्यात मारून तिचा खून केला. हरसूल पोलिसांनी त्यास अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.

हरसूल पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक चेतन लोखंडे, उपनिरीक्षक मोहित मोरे, सुनील आहेर, अंमलदार युवराज चव्हाण, रविकिरण पवार, विलास जाधव, हेमंत पवार, मोरेश्वर पिठे आदींच्या पथकाने खुनाचा गुन्हा उघडकीस आणला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT