छत्रपती संभाजीनगर : शहरात पोलिसांच्या नाकात दम आणणारे चार ते पाच गुन्हेगार चार सहा महिने जेलमध्ये राहून बाहेर येताच नवे कांड करण्यात सराईत बनले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्यावर मोक्का, स्थानबद्धतेची कारवाई करूनही काहीएक परिणाम होत नाही.
जेलच्या बाहेर त्यांच्या टोळ्या स्वागतासाठी आतिषबाजी करतात. घरापर्यंत जंगी वाहन रॅली निघते. सोशल मीडियावर गुन्हेगारांच्या प्रोफाइलवर गँगस्टर, माफिया, डॉन असे हॅशटॅग टाकून रील व्हायरल केल्या जात आहेत. न्यायालय आणि जेलबाहेरचे व्हिडिओ व्हायरल होतात. तरीही पोलिसांना याचा थांगपत्ता लागत नाही.
पुंडलिकनगर भागातील गुंड टिप्या ऊर्फ जावेद शेखने जेलमधून सुटल्यानंतर आतिषबाजी करत जेलपासून घरापर्यंत भव्य वाहन रॅली काढली होती. ऐन निवडणुकीच्या काळातच तो बाहेर आला होता. त्याच्या काही दिवसांतच टिप्याने तरुणावर सेव्हन हिल भागातील बंजारा हॉटेलमध्ये जीवघेणा हल्ला केला होता. त्या गुन्ह्यात पुन्हा त्याने जेलमध्ये गेला. काही दिवसांपूर्वीच बाहेर आल्यानंतर त्याने एकाला चाकू लावून अडीच लाख लुटले. तो अजूनही पोलिसांना सापडलेला नाही.
छावणी भागातील बब्बी ऊर्फ निशिकांत शिर्केने रेकॉर्डवरील आर-ोपी साईनाथ गायकवाडवर जीवघेणा हल्ला केला. तसेच पुंडलिकनगर भागातीलच कुख्यात पवन जैस्वालने थेट सीआयडीच्या पोलिस निरीक्षकाच्या शासकीय वाहनावर हल्ला करून अंमलदाराला जखमी केले होते. त्यात पुंडलिकनगर पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे. तर कुख्यात जमीर कैची याने किराडपुरा भागात व्यापाऱ्याला खंडणीची मागणी करत दुकानात तोडफोड करून हल्ला केला होता. आता तेजाने जेलच्या बाहेर येताच जंगी रॅली काढून सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केला. जुन्या मैत्रिणीवर गोळी झाडल्याने हे गुन्हेगार पोलिसांची डोकेदुखी बनले आहेत. दरम्यान, गुन्हेगार टोळींवर पोलिसांनी अंकुश लावावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
कुख्यात जावेद ऊर्फ टिप्या, फैजल ऊर्फ तेजा, निशिकांत ऊर्फ बब्बी, पवन जैस्वाल, कुख्यात गुन्हेगार जमीर कैची यांच्या गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. पिस्तूल, चाकू, तलवारी अशा घातक हत्याराने खंडणी, अपहरण, लूटमार करणाऱ्या यांच्या टोळ्या सक्रिय आहेत. मात्र, या टोळ्यांवर पोलिसांचा वचक राहिलेला नाही. याची दहशत मोडीत काढण्यासाठी आता पोलिस आयुक्तांनीच ठोस आणि कडक कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे. सोशल मीडियावर गुन्हेगारांचे फॉलवर्स असून व्हिडिओमध्ये दिसणारे टोळीतील सदस्यांची कुंडली पोलिसांकडे असूनही त्यांच्यावर पायबंद घालण्यात यंत्रणा अपयशी ठरताना दिसत आहे.