Murder within police station limits
सिडको (नाशिक) : अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत मागील आठवडयात अंबड गावात युवकाचा पाठलाग करून हत्या केल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी (दि.8) रोजी दुपारी त्रिमूर्ती चौक या भागातील एका मद्याच्या दुकानासमोर किरकोळ भांडणाच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत एका ६५ वर्षीय एका वृद्धाचा खून झाल्याची घटना घडली आहे, याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीवर गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवार (दि.8) रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास त्रिमूर्ती चौक येथील देशी बार समोर संशयित आरोपी सरमोद कोल (३५ रा हल्ली मुक्काम त्रिमूर्ती चौक मुळ रा सतना मध्य प्रदेश) याने किरकोळ वादातून गणपत चंदर घारे (६५ रा त्रिमूर्ती चौक) यांना लाकडी दांड्याने जबर मारहाण केली. यामध्ये त्याच्या डोक्यावर, चेहऱ्यावर वर्मी घाव लागल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी त्वरित जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू असताना त्यांचा यात दुर्देवी मृत्यू झाला या प्रकरणी अंबड पोलीसांनी संशयित आरोपी सरमोद कोल यास घटनास्थळावरूनच ताब्यात घेतले असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे
सिडको परिसरात असलेल्या त्रिमूर्ती चौक दत्त मंदिर चौक पाथर्डी फाटा लेखा नगर स्वामी नगर सिमेंट स्टॉप अंबड आदी भागात दुपारी व सायंकाळी मद्यपी तेथेच दारू घेतात व त्या ठिकाणी उघडपणे पीत असतात यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी होते समोरासमोर आल्यावर अनेक वेळा यांच्या वाद होतात व त्याचे रूपांतर हाणामारीत होते यासाठी त्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे सदर दुकान चालकांना वर कारवाई करण्याची मागणी वाहनधारक व रहिवाशी मधून होत आहे