

सिडको (नाशिक) : अंबड परिसरातील फडोळ मळा येथे पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या किचन ट्रॉली कंपनीला सोमवारी दुपारी चारच्या सुमारास शॉर्टसर्किटने अचानक आग लागली . अग्निशमन विभागाने चार बंबाच्या साहाय्याने दोन तासात आग आटोक्यात आणली. परंतु या आगीत सुमारे लाखो रुपयांचे नुकसान होऊन कंपनी जवळपास खाक झाली.
अंबड परिसरातील फडोळ मळा या भागात श्रृष्टी एस एस किचन ही कंपनी एका शेडमध्ये किचन ट्रॉली बनवण्याचे काम चालते. या कंपनीत सोमवारी दुपारी चारच्या सुमारास केबिनमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली. या आगीने क्षणार्धात रोद्र रूप धारण केले. कंपनीतील कामगारांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र ही आग वाढल्याने सिडको अग्निशमन विभागाला कळविण्यात आले. अग्निशमन विभागाच्यासिडको, सातपूर व अंबड औदयोगिक वसाहत येथील चार बंबानी दोन तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत फर्निचर फोम व किचनचे साहित्य असे सुमारे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही.