सिडको (नाशिक): दोन महिन्यांपूर्वी कामगारनगर येथे झालेल्या खुनाचा बदला म्हणून १० दिवसांपूर्वीच बालसुधारगृहातून सुटका झालेल्या १७ वर्षीय विधिसंघर्षीत मुलाचा सोमवारी (दि.28) दुपारी २ च्या सुमारास कामटवाडे स्मशानभूमीजवळ तीन ते चार जणांनी दगड व फरशी डोक्यात टाकून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. करण चौरे (१७, रा. संत कबीरनगर, महात्मानगर) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार करण चौरे याचा गंगापूर हद्दीतील एका खुनाच्या गुन्ह्यात समावेश असल्याच्या संशयाने त्याच्यावर कायदेशीर कार्यवाही सुरू होती. तर वय कमी असल्याने त्याला बालसुधार गृहात ठेवण्यात आले होते. मात्र आठ दिवसांपूर्वीच तो बाहेर आला होता. परंतु जीवाला धोका असल्याचे आई-वडिलांना सांगून तो कामटवाडे येथे एका मित्राच्या घरी राहत होता. सोमवार दुपारी २ च्या सुमारास करण कामटवाडे येथील स्मशानभूमी रोड येथून जात असताना संशयित चिमण्या ऊर्फ महेश सोनवणे, सुमित बगाटे व त्यांच्या साथीदारांनी करण यास थांबवून मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी दगड व फरशी करणच्या डोक्यात टाकल्याने त्यास डोक्यास गंभीर इजा झाल्याने व मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेबाबत अंबड पोलिसांना माहिती समजताच घटनास्थळी परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख, अंबड ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राकेश हांडे, सह पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच संशयिताच्या शोधासाठी पोलिसांनी पथक तयार केली आहेत. तर आकाश चौरे यांच्या फिर्यादीहून अंबड पोलिसांत संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, मयत करण हा वडिलांना प्लंबिंगच्या कामात मदत करायचा. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, वहिनी असा परिवार आहे.
कामगारनगर येथे अरुण बंडी याचा ८ मार्च रोजी खून झाला होता. या प्रकरणात मयत करण गेल्या दीड महिन्यापासून बालसुधारगृहात होता. १९ एप्रिल रोजी तो बाहेर आला होता. मयत बंडी याचे साथीदार संशयित चिमण्या ऊर्फ महेश सोनवणे, सुमित बगाटे व त्यांचे साथीदार हे करणला धमकी देत होते. जीविताला धोका निर्माण झाल्याने करण हा कामटवाडे भागात मित्राच्या घरी राहायला गेला होता. संशयितांनी त्याच्यावर हेर ठेवत कामटवाडे भागात खून केला.