जानोरी : दिंडोरी तालुक्यातील गणेशगाव येथे अति मद्यप्राशन केल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ज्ञानेश्वर उत्तम पिंगळ (४०) यांनी मित्रांसोबत आंबेरोडवरील एका हॉटेलमध्ये मद्यप्राशन केले.
रात्री उशिरा सोमनाथ भवर हे त्यांना घरी सोडण्यासाठी गेले असता घरासमोरच गाडीवरून खाली पडले. त्यानंतर सोमनाथ निघून गेले. सकाळी ज्ञानेश्वर यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. दिंडोरी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. घटनेविषयी शंका उपस्थित झाली. त्यानंतर पोलिसांनी विविध अंगाने तपास करत गाडीवरून पडून, अती मद्यप्राशन आणि थंडीमुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर चित्र स्पष्ट होणार आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. ज्ञानेश्वर पिंगळ यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.