नाशिक : सातपूर येथील प्रबुद्धनगरमधील महिंद्रा कंपनीच्या गेटजवळ रविवारी (दि. 4) मध्यरात्री उशिरा दोन संशयितांनी सीएट कंपनीतील कामगारावर हल्ला करीत खून केला.
सोमवारी (दि. 5) रोजी सकाळी मृतदेह आढळल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. संजय पुंडलिक जाधव (५०, रा. अशोकनगर, सातपूर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
सातपूर पोलिसांनी तपास करीत संशयित अनिल गांगुर्डे व अमित जाधव (२७, रा. सातमाउली चौक, अशोकनगर) या दोन संशयितांना पकडले. प्रबुद्धनगर परिसरात पहाटे रक्ताच्या थारोळ्यात एकाचा मृतदेह आढळला. डोक्यात दगड घालून व धारदार शस्त्राने वार केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी परिमंडळ दाेनच्या उपायुक्त माेनिका राऊत, गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त शेखर देशमुख, सातपूरचे प्रभारी पोलिस निरीक्षक रणजित नलावडे आदींसह पथक दाखल झाले. पथकाने पंचनामा करीत चौकशी सुरू केली. त्यात मृत व्यक्ती सीएट कंपनीतील कामगार असल्याचे समजले. दरम्यान, खुनाचे कारण स्पष्ट झाले नसून, संशयितांकडे चौकशी केली जात आहे.
संजय जाधव हे सीएट कंपनीत कार्यरत होते. त्यांच्या त्यांच्या पश्चात मुलगा व मुलगी आहे. मुलगी पुण्यात, तर मुलगा अहिल्यानगर येथील कंपनीत नोकरीस आहेत. जाधव हे महिंद्रा गेटजवळून मध्यरात्री जात असताना दोघे संशयित आले. त्यांनी अज्ञात कारणातून जाधव यांच्याशी वाद घालून त्यांना मारहाण केली. त्यानंतर दगड डोक्यात घालून व धारदार शस्त्राने वार करून खून केला.