मालेगाव (नाशिक) : प्रमोद सावंत
नाशिक अन् धुळे जिल्ह्याच्या सरहद्दीवरील मालेगाव तालुक्यातील गाव. येथे सकाळपर्यंत अंगणात खेळणारी, दुडुदुडु धावणारी, आई, बाबांची लाडकी साडेतीन वर्षीय चिमुकली अचानक बेपत्ता होते. तीन तासांच्या शोधानंतर शोध संपतो. त्यावेळी गावात टॉवरजवळ चिमुकलीचा दगडाने ठेचलेला मृतदेह मिळतो. तिच्यावर लैंगिक अत्याचार आणि त्यानंतर दगडाने ठेचून खून झाल्याचे समजते. अन् माणुसकीला काळिमा फासणार्या या घटनेने अवघ्या ग्रामस्थांच्या पायाखालची वाळू सरकते.
गावात बोटावर मोजता येतील एवढी घरे असलेल्या कुटुंबाच्या न्यायासाठी सारा गाव चिल्ल्या-पिल्ल्यांसह रस्त्यावर उतरतो. सोमवारी (दि. 17) गावात एकाही घरात चूल पेटली नाही. अवघ्या गावाचा जणू काही सोमवारचा उपवास अन् मागणी एकच. नराधमांला आमच्या ताब्यात द्या. गावात भर चौकात फाशी द्या, जाळा अशा संतप्त भावना. अत्याचार व निर्घृण हत्येच्या या घटनेने सारा परिसर हादरला. चर्चा संशयित विजय संजय खैरनार (24) याने हे कृत्य का केले असेल ? त्यातून चिमुकलीच्या वडिलांशी विजयचे काही महिन्यांपूर्वी भांडण झाले होते. त्यातून त्याने ही न समजणारी कळी खुडली. त्यानंतर तिच्या डोक्यात दगड घालून ठेचून खून केला. सारे अंगावर शहारे आणणारे.
बालिकेच्या आईला तर शब्द फुटेना. मृतदेह पाहून भल्याभल्यांना भोवळ आली. विजयने थंड डोक्याने पूर्ववैमनस्यातून मुलीला खेळत असताना चॉकलेटचे आमिष दाखवून हे कृत्य केले. या घटनेने काटवन भाग दुसर्यांदा हादरला. सव्वादोन वर्षांपूर्वी पोहाणे (ता. मालेगाव) येथे धनाच्या लालसेपोटी नऊवर्षीय चिमुरड्याची हत्या करून नरबळी देण्याचा प्रकार घडला होता. ही घटना विस्मृतीत जात नाही तोच याच काटवन भागात हा प्रकार घडला. अशा विकृती ठेचतानाच नव्याने असे कृत्य करण्यास कोणी धजावणार नाही अशी शिक्षा व उपाययोजना केल्या पाहिजेत. मालेगाव वकील संघाने या संशयिताचे आरोपपत्र घेणार नसल्याचे जाहीर केले. त्यांच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.
महिलांचा रुद्रावतार
चिमुकलीवर अत्याचार करणारे असे नराधम मोकाट फिरतील, तर आम्ही काय घराबाहेर पडायचे नाही का, आम्ही आयुष्यभर काय चूल अन् मूलच करू का? शिकायचे कसे, समाजात वावरायचे कसे, त्या नराधमाला चौकातच फाशी द्या, आमच्यासमोरच चिमुकलीबरोबर त्यालाही जाळा अशा संतप्त भावना व्यक्त करत चिमुकलीचे नातेवाईक व डोंगराळे येथील महिलांनी रुद्रावतार धारण केला होता. महामार्गावर करण्यात आलेल्या रास्ता रोकोप्रसंगी त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी जमिनीवर बसकन मारत या महिलांच्या भावना समजून घेतल्या. त्यांचे सांत्वन करतानाच आरोपीला कठोर शिक्षेसाठी सारे काही करू. त्याला फाशीच झाली पाहिजे ही सर्वांची भावना आहे. या घटनेने सार्यांचे हृदय पिळवटून निघाले आहे. असेही घडू शकते याचा विचारच करवत नाही, असे महिला सांगत होत्या. महाविद्यालयीन व शाळकरी मुलीही या भावना व्यक्त करण्यात आघाडीवर होत्या.