मालेगाव (नाशिक) : तालुक्यातील चिमुकलीवर गावातीलच नराधमाने लैंगिक अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या केली. या घटनेमुळे संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून, येथील सुवर्णकार समाजातर्फे निषेध व्यक्त करून जनआक्रोश मोर्चा काढत आंदोलन करण्यात आले.
याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदार विशाल सोनवणे यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले. सुवर्णकार व्यावसायिकाची चारवर्षीय मुलगी रविवारी (दि. 16) दुपारी बेपत्ता झाली होती. तिचा शोध घेतला असता, तिचा मृतदेह सायंकाळी गावाबाहेर मिळून आला. तिच्यावर शारीरिक अत्याचार झाला असल्याचे दिसून आल्याने एकच खळबळ उडाली.
या घटनेचे पडसाद मालेगाव, नाशिकसह राज्यभरात उमटले. मालेगाव शहर सुवर्णकार समाजातर्फे या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. घटनेचा निषेध म्हणून मालेगाव समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दुसाने यांच्या नेतृत्वाखाली समाजबांधवांनी मोसम पुलावर ठिय्या आंदोलन केले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, आमदार चित्राताई वाघ, अपर जिल्हाधिकारी, अपर पोलिस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात, संशयिताला कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली.
आंदोलनात समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दुसाने, कार्याध्यक्ष शरद दुसाने, उपाध्यक्ष मंगेश जाधव, सचिव राजेंद्र मोरे, देवेद्र वाघ, किशोर इंदोरकर, सुधीर जाधव, माजी नगरसेवक मदन गायकवाड, सुरेश गवळी, जितेंद्र तिसगे, भरत पाटील, अशोक बागूल, अमोल दुसाने, सागर दुसाने, आविष्कार बागूल, जयघोष जाधव, कल्पेश थोरात, डॉ. नीलेश जाधव, तेजस आघारकर, भिका विसपुते, कृष्णा मोरे, योगेश वडनेरे, प्रसाद मोरे, महेंद्र मोरे, दर्शन खरोटे, मीराताई दुसाने, वैशाली बागूल, भारती जाधवसह शेकडो समाजबांधव तसेच शहरातील नागरिक उपस्थित होते. यावेळी काही काळ मोसम चौकात वाहतूक कोंडी झाली होती. या घटनेच्या निषेधार्थ सुवर्णकार समाजाच्या वतीने मंगळवारी (दि. 18) व्यावसायिकांनी अर्धा दिवस दुकाने बंद ठेवण्याचे आयोजन करण्यात आले आहे.