इगतपुरी (नाशिक) : शहरातील मीनाताई ठाकरे संकुलांच्या गाळ्यांमध्ये अवैध क्रेडिट कार्ड रक्कम, कर्ज रिकव्हरी करणाऱ्या कॉलसेंटरवर इगतपुरी पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत २४ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता शुक्रवार (दि. १९ )पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इगतपुरी पोलिस ठाण्याच्या निरीक्षक सारीका अहिरराव यांना व त्यांच्या पथकाला मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार सोमवार (दि. १५) सायंकाळी ६ वा. शहरातील मीनाताई ठाकरे संकुल येथे अवैधरित्या चालणाऱ्या कॉल सेंटरवर छापा टाकण्यात आला. या ठिकाणी क्रेडीट कार्डद्वारे दिले गेलेल लोन, गृह कर्ज व संबंधित कर्जाची रिकव्हरी करण्याकरीता कर्ज खातेदार आणि त्यांचे नातेवाईक, मित्र, शेजाऱ्यांना बँकेकडील बनावट ओळख धारणकरुन बेकायदेशीरपणे धमकीचे कॉल करून कर्ज वसुलीचा प्रयत्न केला जात असल्याचे समोर आले.
या ठिकाणी ४० ते ५० कर्मचारी काम करत असल्याचे तसेच हे कर्मचारी अवैधरित्या कर्जदारांचा वैयक्तीक डाटा संकलीत करत असल्याचे दिसून आलेले आहे. या कॉल सेंटरला स्थानिक नगरप्रशासनाचा परवाना नसल्याचे निदर्शनास आले. या कॉल सेंटरवर आरबीएल, एचडीबी फायनान्स, ग्रो फायनान्स यांचे कर्जवसुलीचे काम करत असल्याचे दिसून आले. गुन्ह्याचा तपास सायबर पोलिस ठाण्यातील नागेश मोहीते हे करत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रवींद्र मगर, सायबर पथकाचे पोलिस निरीक्षक नागेश मोहीते तसेच पथकातील सहायक पोलिस उपनिरीक्षक गणेश परदेशी, हवालदार विनोद गोसावी, नीलेश देवराज, अभिजीत पोटींदे, राहुल साळवे यांच्यासह सायबर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे, दिंगबर थोरात, हवालदार परिक्षीत निकम, तुषार खालकर, सुनील धोकरट आदींनी संयुक्तपणे ही कारवाई केली.