ठळक मुद्दे
ग्राहकांनी गहाण ठेवलेले सोन्याचे दागिने सराफ व्यावसायिकाने केले लंपास
पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
'मला फक्त तुमचे एकट्याचेच दागिने काढता येणार नाही... काही दिवस थांबा' म्हणत सराफ व्यावसायिकाने केली फसवणूक
नाशिक : गहाण ठेवलेले सोन्याचे दागिने परत न देता ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या सराफ व्यावसायिकाविरूद्ध पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लता प्रकाश राजपूत (४७, रा. ओमनगर, नामको हॉस्पिटलजवळ, पेठरोड, पंचवटी) यांनी याप्रकरणी संशयित सराफ व्यावसायिक ज्ञानेश्वर सुधाकर माळवे याच्याविरोधात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार १ फेब्रुवारी २०२३ रोजी मुलगा सिओम प्रकाश राजपूत (२५) याच्यासोबत संशयित सराफ व्यावसायिक माळवे याच्या आरटीओ ऑफिसमोरील रोहित ज्वेलर्स येथे दोन महिन्यांकरिता ५० हजार रुपये किंमतीचे १० ग्रॅम वजनाचे कानातील टॉप्स आणि ६५ हजार रुपये किंमतीची १३ ग्रॅम वजनाची पेंडल पोत ६० हजार रुपयात तारण ठेवले होते.
पुढे ४ एप्रिल २०२३ रोजी दोन महिन्यांचे ३६०० रुपये व्याज आणि ६० हजार रुपये मुद्दल घेवून त्या संशयित माळवे याच्याकडे दागिने सोडविण्यासाठी गेल्या. मात्र, माळवे याने दागिने बँकेत ठेवलेले असून, दोन ते तीन दिवसांनी मिळणार असल्याचे सांगितले. त्यानुसार फिर्यादी या तीन दिवसांनी पुन्हा दागिने घेण्यासाठी गेल्या असता, 'मला फक्त तुमचे एकट्याचेच दागिने काढता येणार नाही. तर तुम्ही काही दिवस थांबा मी सर्व दागिने काढूण आणतो, मग तुमचे व इतर ग्राहकांचे दागिने परत करतो' असे सांगितले. त्यानुसार २० मे २०२३ पर्यंत फिर्यादीने वेळोवेळी दागिन्यांसाठी दुकानात चकरा मारल्या. मात्र, प्रत्येकवेळी संशयिताने वेगवेगळी कारणे सांगितले. २२ मे रोजी फिर्यादी दुकानावर गेल्या असता, त्यांना दुकान बंद असल्याचे दिसून आले.
यावेळी त्यांना दुकान परिसरात ओळखीच्याच बेबीबाई पगारे, आशा पवार, पूजा लष्कारे, सुनीता धोत्रे, ज्योती पाडवी, संगीता महिरे, संगीता गांगुर्डे, महेश धनगर, मनोज परदेशी, सुधाकर वसावे आदींची तारण ठेवलेले दागिने संशयिताने परत केली नसून दुकान बंद करून संशयित पसार झाल्याचे समोर आले. दरम्यान, फसवणूक झाल्याची बाब लक्षात येताच संशयित सराफ व्यावसायिक याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंचवटी पोलिस याप्रकरणी तपास करीत आहेत.
संशयित सराफ व्यावसायिक ज्ञानेश्वर माळवे याने ग्राहकांचा विश्वास संपादन करून तब्बल सात लाख एक हजार रुपये किंमीतेच दागिने लंपास करून अपहार केल्याचे समोर आले आहे. संशयिताने आणखी ग्राहकांची फसवणूक केल्याचा अंदाज असून, पोलिस त्यादृष्टीने तपास करीत आहेत.