

सातपूर (नाशिक) : छातीवर लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दोन विधिसंघर्षित बालकांनी आपल्याच वर्गातील सहकारी विद्यार्थ्याची हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. बेंच पुढे घेण्यावरून त्यांच्यात वाद झाला होता. दोन्ही संशयित बालकांना ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर सातपूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रविवारी (दि. ३) दोघांना न्यायालयात हजर केले असता, बालन्याय मंडळाने त्यांना ताब्यात घेऊन त्यांची बालनिरीक्षण गृहात रवानगी करण्यात आली आहे.
यशराज तुकाराम गांगुर्डे (१६, रा. अशोकनगर, पवार संकुल) असे खून झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. यशराजने दहावीचे वर्षे असल्याने राज्य कर्मचारी वसाहत (सातपूर) येथील ज्ञानगंगा क्लास याठिकाणी खासगी शिकवणी लावली होती. याठिकाणी बेंच पुढे घेण्यावरून दोन दिवसांपूर्वी दोघांनी त्याच्याशी वाद घातला होता. शनिवारी (दि. २) सायंकाळच्या सुमारास जेव्हा यशराज क्लासला आला, तेव्हा या दोघांनी भांडणाची कुरापत काढून वाद घालत शिवीगाळ केली. तसेच त्याला लाथाबुक्क्यांनी छातीवर जबर मारहाण केली. बरगड्यांना जबर मार लागल्याने तो जागीच कोसळला अन् बेशुद्ध पडला तसे हल्लेखोर पसार झाले.
ही बाब लक्षात आल्यानंतर, यशराजला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. दरम्यान, क्लासचालकांनी याबाबत आपणास काहीही माहीत नसल्याचे सांगितल्याने, घटनेविषयी परिसराच चर्चा रंगली होती. सातपूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत चौकशी केली. त्यात सीसीटीव्ही फुटेजमध्ये यशराजला मारहाण होत असल्याचे समोर आल्याने, त्याचा खून केल्याचे समोर आले. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोन विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी (दि. ३) त्यांना न्यायालयात हजर केले असता, बालन्याय मंडळाने त्यांना ताब्यत घेऊन त्यांची बालनिरीक्षण गृहात रवानगी केली आहे.
नाशिक येथील बालनिरीक्षण गृहात जागा उपलब्ध नसल्याने, दोन्ही विधिसंघर्षित बालकांची मनमाड येथील बालनिरीक्षण गृहात रवानगी करण्यात येणार असल्याची माहिती पुढे येत आहे. या प्रकरणाचा पोलिस उपनिरीक्षक भडांगे तपास करीत आहेत.
यशराजच्या हत्येनंतर क्लासमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे. हत्या क्लासबाहेर झाली असली, तरी वादाची सुरुवात क्लासमधील बेंचवरून झाली होती. शिक्षकांनी वेळेवर मध्यस्थी करत, विद्यार्थ्यांची समजूत काढली असती किंवा त्यांना समज दिली असती, तर हा प्रकार टळू शकला असता, अशी चर्चा सध्या सुरू आहे.