नाशिक : म्हसरूळ कलानगर येथील बांधकाम व्यावसायिक साई अंगद उमरवाल यांच्या घरावर केलेल्या गोळीबार व दगडफेकीच्या घटनेला २४ तास उलटले असले, तरी पोलिसांना अजूनही संशयितांचा थांगपत्ता लावण्यात अपयश आल्याचे दिसत आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलिसांची दोन पथके तयार करण्यात आली असून, एका पथकाकडून सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण केले जात असून, दुसरे पथक टवाळखोर, सराईतांची झाडाझडती घेत आहे. मात्र, गुन्ह्याच्या तपासात अद्याप प्रगती नसून, पोलिसांची तपासाची भिस्त सीसीटीव्ही फुटेजवरच असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, गाेळीबारानंतर मिळालेली पुंगळी एअरगनची असल्याचा दावा पाेलिसांनी पुन्हा एकदा केला आहे.
उमरवाल यांचा मुलगा बांधकाम व्यावसायिक असून, ताे जमीन खरेदी - विक्रीचे काम करताे. तसेच कुणाशी नवे - जुने वादही नाहीत, असे कुटुंबाने म्हटले आहे. त्यामुळे त्यांना धमकाविण्यासह खंडणी उकळण्यासाठी किंवा व्यावसायिक व्यवहाराच्या कारणातून संशयित टाेळीने हे दाेन हल्ले केले आहेत का, की अन्य काही वैयक्तिक कारण आहे, या दृष्टीने पाेलिस तपास करत आहेत.