नाशिक : सोशल मीडियातून अल्पवयीन मुलामुलींचे अश्लिल व्हिडीओ, फोटो व्हायरल करणाऱ्या खातेधारकांविरोधात सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस अंमलदार ईश्वर सुरवाडे यांनी फिर्याद दाखल केली आहे.
भारत सरकारच्या दि नॅशनल सेंटर फॉर मिसींग ॲण्ड एक्सप्लोईटेड चिल्ड्रेन आणि नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो यांच्याकडून अल्पवयीन मुलामुलींवरील लैंगिक अत्याचाराबाबत कडक धोरण राबवण्यात येते. त्यात बालकांचे अश्लिल छायाचित्र काढणे, चित्रीकरण करणे, व्हिडीओ बाळगणे किंवा त्यांचा प्रसार करणे हा माहीती तंत्रज्ञान कायदा- २०००, कलम ६७ (ब) प्रमाणे गुन्हा आहे. अशा प्रकारचा अपराध करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश सायबर पोलिसांना देण्यात आले आहेत. त्यानुसार राज्याच्या सायबर पोलिसांना मिळालेल्या सीडीमधील टीपलाईन मधील इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप व इतर माध्यमांवरील खातेधारकांनी स्वत:च्या खात्यावरुन अल्पवयीन बालकांचे अश्लिल व्हिडीओ २०२२ ते २०२३ या कालावधीत सोशल मीडियावरुन व्हायरल केले होते. त्यामुळे नाशिक सायबर पोलिसांनी संबंधित सोशल मीडियावरील खातेधारकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.