

जळगाव : आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत एरंडोल येथील एका तरुणीवर जळगावातील हॉटेलमध्ये अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सोमवार (दि.26) रोजी उघडकीस आली असून, एमआयडीसी पोलीस ठाण्यात संबंधित प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 वर्षीय पीडित तरुणी ही सध्या एरंडोल शहरात वास्तव्यास असताना तिची ओळख ऑगस्ट 2024 मध्ये विश्वजीत विठ्ठलसिंग सिसोदे (वय 27, रा. बरेजवळा, ता. खामगाव, जि. बुलढाणा) याच्याशी झाली.
विश्वजीतने लग्नाचे आमिष दाखवत पीडितेला जळगाव एमआयडीसीमधील एका नामांकित हॉटेलमध्ये नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. यानंतर त्याने तिचे व्हिडीओ आणि चॅटिंग क्लिप्स दाखवून आई-वडिलांना ते पाठवण्याची धमकी देत पुन्हा-पुन्हा अत्याचार केला. इतकेच नव्हे तर, पीडितेच्या वडिलांना व्हॉट्सॲपवरून जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या. या त्रासाला कंटाळून पीडित तरुणीने अखेर एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार, संशयित आरोपी विश्वजीत सिसोदेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे करत आहेत.