घोटी : इगतपुरी तालुक्यातील एका खासगी शाळेतील मुख्याध्यापकाने 13 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना शुक्रवारी (दि.7) रोजी उघडकीस आली होती. याप्रकरणी अटक असलेल्या मुख्याध्यापक व शिक्षकास रविवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने मुख्यध्यापकास चार दिवसांची (१३ फेब्रुवारी पर्यंत) पोलिस कोठडी तर शिक्षकास न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील एका खासगी शाळेत तास चालू असतांना मुख्याध्यापक तुकाराम गोविंद साबळे (५३) याने सहावीतील विद्यार्थिनीस घरी बोलावून तिच्यावर अत्याचार केला होता. याकामी शिक्षक गोरख मारुती जोशी (43) याने विद्यार्थिनीस घरी पाठवित गुन्ह्यात मदत केली होती. या प्रकरणी दोघांवर बाल लैगिंग अत्याचार कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध होत असून दरम्यान, सदर प्रकरण फास्ट ट्रॅकवर कोर्टात चालवून दोषींना फाशी द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.