

घोटी / इगतपुरी : तालुक्यातील घोटी पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या गावात मुख्याध्यापकानेच इयत्ता सहावीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना शुक्रवारी (दि. 7) घडली. याप्रकरणी पीडितेच्या आजीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत संशयितासह गुन्ह्यात मदत करणाऱ्या शिक्षकाला अटक केली.
याप्रकरणी दाखल फिर्यादीनुसार तालुक्यातील गावात खासगी शिक्षण संस्थेंतर्गत इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज चालविले जाते. या शाळेत इयत्ता सहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीला शुक्रवारी दुपारी 2.30 च्या सुमारास शाळेतील संशयित मुख्याध्यापक तुकाराम गोविंद साबळे (53) याने घरकाम करण्याच्या बहाण्याने वर्गशिक्षक गोरख मारुती जोशी (43) याच्या मदतीने घरी बोलावून घेत अत्याचार केला. त्यानंतर मुलीला घरी पाठवून दिले. पीडितेच्या कुटुंबातील सर्व जण गावातीलच लग्नासाठी बाहेरगावी गेलेले असल्याने ते सायंकाळी घरी परतल्यावर पीडितेला त्रास होत असल्याने त्यांनी याबाबत चौकशी केली असता पीडितेने घडलेला सर्व प्रकार कुटुंबीय व मैत्रिणींना सांगितला. त्यानंतर पीडितेच्या आजी व पालकांनी सायंकाळी घोटी पोलिस ठाण्यात धाव घेत घडलेला प्रकार सांगितला.
पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत गुन्हा दाखल करत रात्रीतूनच संशयित मुख्याध्यापक साबळे व शिक्षक जोशी या दोघांना अटक केली. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता आणि बाल संरक्षण व अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, संशयितावर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी शाळेबाहेर ग्रामस्थांनी गर्दी केली होती. घटनेनंतर उपविभागीय पोलिस अधिकारी हरिश खेडकर व घोटी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेत पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच गावकऱ्यांशी चर्चा करत कडक कायदेशीर कारवाईचे आश्वासन दिले. त्यानंतर जमाव शांत झाला.
अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळत आरोपींना फाशीची शिक्षा करण्याची मागणी केली. तसेच याप्रकरणी संबधित शिक्षकांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थ व विविध आदिवासी संघटनांनी दिला आहे.
घटनेनंतर संस्थाचालकांनी शाळेत धाव घेत संशयित मुख्याध्यापक व शिक्षकाला तत्काळ निलंबित करण्यात येत असल्याचे जाहीर केले. दरम्यान, पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी अथवा शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून अद्याप याप्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया आलेले नाही.
माणुसकीला काळीमा फासणारी घटनेतील संशयित आरोपी शिक्षक व मुख्याध्यापकावर बडतर्फीची कारवाई करण्याचे आदेश शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत. त्यानुसार शिक्षण विभागाने शिक्षक व मुख्याध्यापकावर तातडीने निलंबनाची कारवाई केली असून दोषी आढळल्यानंतर बडतर्फीची कारवाई केली जाणार आहे. तसेच या गुन्ह्याचा गंभीरपणे तपास करत आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही पोलिस अधिक्षकांनादेण्यात आले आहेत.