सिडको (नाशिक) : सिडको परिसरात टोळक्यांमध्ये दोन दिवसांपूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी दुसऱ्या टोळीच्या तीन ते चार गुंडांनी एका फर्निचरच्या दुकानाच्या शटरवर कोयत्याने हल्ला करत दहशत निर्माण केल्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी रात्री उशिरा पोलिसांनी मुख्य संशयित हासिम हारुण खान यास ताब्यात घेऊन अटक केली. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या भांडणाची कुरापत काढून हासिम हारुण खान (२४, अंबड) यास संशयित आरोपी गैसुद्दीन वारसी, फैजान खाटीक, दुर्लभ वारसी यांनी २७ मे रोजी सायंकाळी सातच्या सुमारास गणेश चौक येथून घरी जाताना त्याला रस्त्यात गाठून कोयत्याने डोक्यात व पाठीत मारून गंभीर जखमी केले होते. त्याचा बदला घेण्यासाठी बुधवारी (दि. २८) रात्री सातच्या सुमारास उत्तमनगरातील भोळे मंगल कार्यालयाजवळ असलेल्या एका फर्निचरच्या दुकानावर हल्ला करण्याच्या उद्देशाने संशयित हासिम खान, समीर शेख व राशौद खान आले. हातात कोयते असलेल्या या टोळक्याने हासिम वारसू कुठे आहे, असे म्हणत शिवीगाळ केली. तसेच कोयत्याने शटरवर वार करत परिसरात दहशत निर्माण केली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच गुन्हे शोध पथकाचे पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत संशयित आरोपी हे तेथून फरार झाले होते. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राकेश हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने रात्री उशिरा मुख्य संशयित हासिम हारुण खानला शासकीय रुग्णालय परिसरातून ताब्यात घेऊन अटक केली. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.