नाशिक : जुने नाशिक परिसरामध्ये होणाऱ्या एका कार्यक्रमासाठी वर्गणी न दिल्याने चार जणांच्या टोळक्याने एका युवकावर कोयत्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना सोमवारी (दि.३०) घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. तातडीने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.
सोमवारी (दि.30) रोजी रात्री जुने नाशिक परिससरातील नानावलीत केवळ दहा रुपयांच्या वर्गणीवरून सुरू झालेला किरकोळ वाद इतक्या टोक्याला जाईल, अशी कल्पनाही उपस्थितांना नव्हती. वाद फक्त वर्गणी वरून सुरू होता, आणि तो मिटेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. पण रजा फिरोज शेख (१७) या अल्पवयीन युवकावर टोळक्याने एकत्रित येत तेट गळ्यावर धारदार शस्त्राने वार केले. हल्ला इतका जबरदस्त होता की, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रजाला नागरिकांनी तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.
मात्र, डॉक्टरांनी त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितल्याने, त्याच्या नातेवाईकांनी त्याला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवले. दरम्यान, या घटनेमुळे जुने नाशिक परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात संशयित अल्ताफ शहा, नजिम शहा, फिरोज शहा व अयान शहा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चाारही संशयित आरोपी फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.