

नाशिक : निफाड तालुक्यात घडलेल्या डिजिटल ॲरेस्ट प्रकरणात तक्रारदाराला तीन लाख २२ हजार रुपये परत मिळवून देण्यात नाशिक ग्रामीण सायबर पोलिस ठाण्याला यश आले. टाकळी विंचूर येथील सूरज भाऊसाहेब काळे यांना सायबर भामट्यांनी १० लाख रुपयांचा गंडा घातला होता.
तक्रारदार काळे यांच्याशी आरोपींनी 'फेड एक्स'च्या अंधेरी शाखेतून बोलत असल्याचे सांगून संपर्क साधला होता. 'तुमच्या नावे पार्सल प्राप्त झाले असून, त्यामध्ये चार इराणी पासपोर्ट, ड्रग्ज असे बेकायदेशीर सामान आहे', अशी बतावणी करून दबावात घेतले होते. त्यानंतर मोबाइलमध्ये स्काइप ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यास भाग पाडून स्टेटमेंट व व्हेरिफिकेशनसाठी व्हिडिओ कॉल केला होता. पोलिसांच्या गणवेशातील भामट्यांनी डिजिटल ॲरेस्टची धमकी देऊन काळे यांच्या बँक खात्याची गोपनीय माहिती प्राप्त करून घेत, त्याआधारे त्या खात्यावरून १० लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज मंजूर करुन घेत ऑनलाइन (आरटीजीएस) पद्धतीने पैसे वळते करून घेतले होते. याबाबत काळेंनी वेळीच सायबर पोलिसांकडे तक्रार केल्यामुळे तत्काळ संबंधित बँक खाते गोठविल्याने तीन लाख २२ हजार रुपये राखण्यात यश आले. ही रक्कम न्यायालयाच्या आदेशाने काळे यांना सुपूर्द करण्यात आली. सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, नागेश मोहिते आणि हवालदार सुवर्णा आहिरे यांच्या पथकाने ही कार्यवाही केली.
अनोळखी फोन कॉल्सवर विश्वास ठेवून आपल्या बँक खात्याची वैयक्तिक माहिती अनोळखी व्यक्तीला देऊ नये. तसेच फोनवर पाठविण्यात आलेल्या अनोळखी लिंकवर क्लिक करू नये. आपल्या नावे पार्सल, मनीलाँड्रिंग आदी कुणी बतावणी करीत असेल, तर तत्काळ नजीकच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, अथवा सायबर हेल्पलाइन क्रमांक १९३० किंवा १९४५ तसेच सायबर क्राइम पोर्टल cybercrime.gov.in यावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.