नाशिक : मयत व्यक्तीच्या अपघाती विम्याचे पैसे हडपण्यासाठी, संबंधितासारख्या दिसणाऱ्या भिकाऱ्याचा खून करून फरार झालेल्या मुख्य सूत्रधाराला साडेतीन वर्षांनंतर अटक करण्यात गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाला यश आले आहे. संशयित आरोपी योगेश साळवी (३१, रा. वैष्णव रोड, मालेगाव स्टँड, पंचवटी) याला रविवारी (दि. 13 जुलै) शिताफीने ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणाची पार्श्वभूमी चक्रावून टाकणारी आहे. नाशिकचे रहिवासी अशोक भालेराव यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या नावे असलेल्या अपघाती विम्याच्या रकमेवर डोळा ठेवून मंगेश सावकार, रजनी उके, दीपक भारुडकर, प्रणव साळवी आणि योगेश साळवी या संशयितांनी कटकारस्थान रचले. त्यानुसार त्यांनी भालेराव यांसारख्या दिसणाऱ्या एका भिकाऱ्याचा खून केला. अपघाती मृत्यूचा बनावा रचून विमा रक्कम हडपण्याचा त्यांचा प्रयत्न मात्र उधळला. या प्रकरणी दि. 28 डिसेंबर 2022 रोजी म्हसरूळ पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून मुख्य संशयित साळवी हा फरार होता. अखेर नाशिकच्या लोणार गल्ली भागातील फनिबाबा येथे तो लपल्याची गोपनीय माहिती पोलिस अंमलदार विलास चारोस्कर यांना मिळाली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने सापळा रचत त्याला ताब्यात घेतले.
भालेराव हे ह्यात असतानाच त्यांचा अपघाती विमा उतरवला होता. त्यांच्या मृत्यूनंतर संशयितांनी विम्याची रक्कम बेकायदेशीर मार्गाने प्राप्त करण्यासाठी भिकाऱ्याचा खून करून अपघाती मृत्यूचा बनावा रचला. अपघातप्रकरणी मुंबई नाका पोलिसांत गुन्हा दाखल होता. त्याच्या तपासात मूळ प्रकार समोर आल्याने पोलिस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत यांनी म्हसरूळ पोलिसांत फिर्याद नोंदवली होती. साळवी हाती लागल्यानंतर त्याने चौकशीत, फरार असताना वेशांतर करून नर्मदा परिक्रमा, प्रयागराज महाकुंभमेळा, त्र्यंबकेश्वर अशा धार्मिक स्थळी आश्रय घेतल्याचे सांगितले. प्रकरण शांत झाल्याच्या विचाराने तो पुन्हा नाशिकमध्ये दाखल झाला होता. मात्र, येथेच तो अडकला. या प्रकरणाचा पुढील तपास गतीने सुरू आहे.