

मनमाड (नाशिक) : पुणे-इंदौर महामार्गावरील पंजाब हॉटेलमध्ये दारू उधार न दिल्याच्या रागातून दोन तरुणांनी बारमालक कुलजीतसिंग कांत यांच्यावर सुरीने प्राणघात हल्ला केला. त्यांनी वार चुकवल्यामुळे प्राण वाचले, मात्र मानेवर जखम झाली. मनमाड पोलिसांनी अर्ध्या तासात दोन्ही आरोपींना अटक केली असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बुधवारी (दि. ९) रात्री १० वाजता पंजाब हॉटेलमध्ये उधारीवर दारू न मिळाल्याने दोन तरुणांनी मालक कुलजीतसिंग कांत यांच्याशी वाद घालत निघून गेले. काही वेळाने परत येऊन त्यांनी शिवीगाळ केली आणि एका तरुणाने सुरीने हल्ला केला. तीन वार झाले, मात्र कांत यांनी बचाव केल्याने ते थोडक्यात बचावले. तरी त्यांच्या गळ्यावर जखम झाली. इतर लोक कांत यांच्या मदतीला धावून आल्यामुळे हल्लेखोरांनी पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक विजय करे यांनी घटनास्थळी धाव घेऊन तेथील सीसीटीव्ही तपासले असता, संदीप भालेराव आणि संघप्रीय भालेराव (दोघे रा. रमाबाई नगर) हे संशयित हल्लेखोर असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पथकाने अवघ्या काही मिनिटांतच दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्न यासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल नोंदवण्यात आला आहे. आरोपींना गुरुवारी (दि. १०) न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
दरम्यान, या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र पारिक यांच्या नेतृत्वाखाली इतर पदाधिकारी आणि व्यापाऱ्यांनी पोलिस उपअधीक्षक बाजीराव महाजन यांची भेट घेऊन आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
हॉटेल मालकाने उधार दारुसाठी नकार दिल्यानंतर आरोपींनी एका भुर्जी विकणाऱ्या हातगाडीवरुन सुरी आणली आणि हा हल्ला केला. त्यांना तत्काळ अटक केलीय. कुणीही अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल
विजय करे, पोलिस निरीक्षक, मनमाड