नाशिक : दरोड्याच्या तयारीतील टोळीला प्राणघातक शस्त्र व साधनांसह ताब्यात घेणारे उपनगर पोलिसांचे पथक.  (छाया: सुधाकर गोडसे)
क्राईम डायरी

Nashik | मध्यरात्री घडलं थरारनाट्य ! चुकून सुटली गोळी अन् हाती लागली दरोडेखोरांची टो‌ळी

उपनगर पोलिसांची कामगिरी; शनिवारी मध्यरात्री थरारनाट्य

पुढारी वृत्तसेवा

देवळाली कॅम्प (नाशिक): उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी (दि. २६) रात्री मोठी घटना घडली. पोलिसांची चाहूल लागताच पळ काढलेल्या दरोडेखोरांच्या टोळीतील एका सदस्याच्या पिस्तुलातून चुकून गोळी सुटली अन् त्यात तो जखमी झाला. त्याच्या उपचारासाठी टोळीने केलेल्या धावपळीत पाचही पोलिसांच्या तावडीत सापडले. त्यांच्याकडून पिस्तुल, दुचाकीसह दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांनी पत्रकार परिषदेत या घटनाक्रमाची माहिती दिली. उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक शनिवारी रात्री गस्तीवर होते. देवळाली गावातील कुस्ती मैदानाच्या भिंतीशेजारी अंधारात सराईत गुन्हेगार सार्थक आहिरे, आबा पवार, हार्दिक बेलदार, पवन घोलप, समीर सोनवणे आणि त्यांचे तीन साथीदार दरोड्याच्या तयारीत दबा धरून बसले होते. गस्ती पथकाची चाहूल लागल्यानंतर, त्यांनी दुचाकीवरून धूम ठोकली.

पोलिसांना बॅटरीच्या प्रकाशात, बेलदारकडे धारधार कोयता, सार्थक आहिरेकडे गावठी पिस्तुल, पवन घोलपकडे दोरी अशी वस्तू दिसली. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला असता, देवळाली गाव आणि अण्णाभाऊ साठेनगरच्या गल्लीबोळातून हे दरोडेखोर पसार झाले. पोलिस त्यांचा मागावर असतानाच पहाटे चारच्या सुमारास सार्थक आहिरे नामक व्यक्ती मांडीला गोळी लागल्याने बिटको रुग्णालयात दाखल झाल्याचे रुग्णालयाकडून समजले. डॉक्टरांनी त्याला जिल्हा रुग्णालयात वर्ग केले होते. पोलिसांनी तत्काळ कार्यवाही करीत त्यासोबत आलेले पवन घोलप व समीर सोनवणे यांचा शोध घेऊन ताब्यात घेतले.

चौघांना पोलिस कोठडी

चौकशीत संशयितांनी घटनाक्रम कथन केला. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी देवळालीगावातून विहितगावकडे दुचाकीवरून जात असताना, सार्थक पँटच्या खिशातून गावठी पिस्तुल बाहेर काढत होता. त्याचवेळी अचानक गोळीचा बार उडाला आणि ती मांडीत घुसली. त्याला उपचाराची आवश्यकता भासल्यामुळे बिटको रुग्णालय गाठल्याचे त्याने सांगितले. त्याचप्रमाणे, हार्दिक बेलदार आणि आबा पवार या साथीदारांचीही त्याने नावे दिली. हवालदार पंकज कर्पे यांच्या फिर्यादीवरून, सार्थक आहिरे, ऋषिकेश उर्फ आबा चंद्रकात पवार (२३), हार्दिक हिरालाल बेलदार (२६), पवन सुनिल घोलप (१९) सर्व रा. देवळालीगाव, समीर संजय सोनवणे (२०, विहीतगाव) आणि इतर तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आबा, हार्दिक, घोलप, सोनवणे या चौघांना अटक केली आहे. न्यायालयाने आरोपींना पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यांच्याकडून गावठी पिस्तुल, कोयता, दोरी, दोन दुचाकी असा दोन लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

बक्षिसासाठी शिफारस

पोलिस निरीक्षक संजीव फुलपगारे, सहाय्यक निरीक्षक शांताराम महाजन, उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, हवालदार विनोद लखन, इम्रान शेख, पंकज कर्पे, सूरज गवळी, संदेश रगतवान, जयंत शिंदे, गौरव गवळी, अनिल शिंदे, सुनील गायकवाड, सौरभ लोंढे, नाशिक रोड पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सूर्ववंशी, नाना पानसरे, समाधान वाजे आदींनी ही कामगिरी केली. त्यांना बक्षिस देण्याची शिफारस वरिष्ठांकडे केल्याचे उपायुक्त मोनिका राऊत यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT