

नाशिक : शहरात दुचाकी चोरीचे सत्र थांबत नसल्याचे चित्र आहे. शुक्रवारी (दि. २६) शहरातून तब्बल सात दुचाकी चोरीला गेल्याचे गुन्हे विविध पोलिस ठाण्यांत दाखल करण्यात आले आहेत, तर दि. १ ते ३० मार्चदरम्यान शहरातून तब्बल ५१ दुचाकी लंपास केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. याशिवाय चार अवजड वाहने आणि एक कारही चोरट्यांनी चोरून नेली आहे.
मागील काही वर्षांपासून दुचाकी चोरीचे सत्र सुरूच आहे. गुन्हे नाेंदीनंतर गुन्हे उकलीचे प्रमाण नगण्य असल्यामुळे चोरीला गेलेली दुचाकी मिळणार की नाही? याबाबत दुचाकीमालक साशंक असल्याने, चोरट्यांनी पोलिसांसमाेर मोठे आव्हान निर्माण केले आहे. गेल्या १ ते ३० मार्चदरम्यान, चोरट्यांनी शहरातून तब्बल ५१ दुचाकी लंपास केल्या आहेत. त्यातील मोजक्याच दुचाकी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले असून, इतर दुचाकींचा शोध घेण्यास अद्यापही पोलिसांना यश आलेले नाही. याशिवाय एप्रिल महिन्यातही चोरीच्या घटना दररोज समोर येणे सुरूच आहे. शुक्रवारी (दि. २५) शहरातून तब्बल सात दुचाकी चोरीला गेल्याची नोंद पोलिसांत झाल्याने, पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. शहरातील अंबड, आडगाव, सातपूर, गंगापूर व नाशिक राेड पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत सातत्याने दुचाकी चोरीच्या घटना समोर येत आहेत. दरम्यान, सीसीटीव्हींमुळे काही दुचाकींचा शोध घेणे पोलिसांना शक्य होत असले, तरी गुन्हे उकल करण्याचे प्रमाण लक्षात घेता, पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक गतिमान करण्याची गरज असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.
दुचाकी चोरीच्या बहुतांश घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचे यापूर्वी समोर आले आहे. अल्पवयीन मुलांसाठी दुचाकी चोरी 'इझी मनी' फॉर्म्युला ठरत आहे. अल्पवयीनांसह सराईतांकडून महागड्या दुचाकी परजिल्ह्यात किंवा ग्रामीण भागात अवघ्या ५ ते १० हजारांत विक्री केल्या जात असल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. दोन- तीन दिवसांत कागदपत्रे आणून देतो, अशी बतावणी करून दुचाकी विक्री केली जात आहे. त्यामुळे पोलिसांनी चोरीची वाहने खरेदी करणाऱ्यांवरही लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे.