धुळे : दोंडाईचा कडून नंदुरबारकडे अवैध दारूची तस्करी करण्याचा प्रयत्न दोंडाईचा पोलिसांनी हाणून पाडला आहे. या कारवाई मध्ये दोघा जणांना अटक करण्यात आली असून सुमारे सहा लाख 55 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अवैध विदेशी दारुची वाहतुक करणाऱ्या इसमांवर दोंडाईचा पोलीसांनी धडक कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने अवैध दारु विक्री वाहतुक करणाऱ्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.त्यानुसार पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे यांनी पथकाच्या माध्यमातून गस्त वाढवली .दोंडाईचा शहरातुन नंदुरबारकडे एक पांढऱ्या रंगाची काळी काच असलेली कारमधुन अवैधरित्या विनापरवाना विदेशी दारुची वाहतुक होणार आहे, अशी माहिती दोंडाईचा पोलिसांना मिळाली.
सदर बातमीच्या अनुषगाने दोंडाईचा पोलीस स्टेशनचे पथक तयार करुन नंदुरबार चौफुली येथे अचानक नाकबंदी करुन येणाऱ्या जाणाऱ्या संशयित वाहनाची तपासणी सुरु केली. त्यावेळी दोंडाईचा बस स्थानकाकडुन येणारी चार चाकी क्र.एम एच -३९-जे-२८६९ हिस थांबवुन पथकामार्फत तपासणी केली असता गाडीत विदेशी दारु अवैधरित्या वाहतुक करतांना मिळुन आली. या वाहनाचा चालक करण कुंदन बजरंगे (रा.कजंरवाडा ता.जि. नंदुरबार) व सोबत शिवाजी धासु वळवी (रा. कोळदे, जि. नंदुरबार) यांच्या ताब्यातुन विदेशी दारु व वाहन असा ६,लाख ५५,हजार ३६० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.