नाशिक : नामको बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत पोलिसांसह एटीएसनेही तपास सुरू केला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर सरकारने या प्रकरणाची गांभीर्याने तपासास सुरुवात केली असून सुरुवातीस 100 कोटी रुपयांचा गैरव्यवहार आता हजारो कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचे दिसत आहे. ऑनलाइन जुगार, ड्रग्जच्या माध्यमातून आलेले पैसे नामकोच्या बँक खात्यात आल्याचा संशय वर्तवला जात आहे. तसेच हवाला रॅकेटमार्फत परदेशात पाठवल्याचे बोलले जात आहे.
निवडणुकीनंतर व्होट जिहादचा मुद्दा चांगलाच ऐरणीवर आला. आता व्होट जिहादसाठी 100 कोटी दिल्याचा गंभीर आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. व्होट जिहादसाठी बोगस कंपन्या स्थापन करून दुबईत पैसे मागवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची 1000 कोटीपेक्षा जास्त व्याप्ती असल्याचे समोर आले आहे. आता या प्रकरणाचा तपास ATS करणार आहे, गृहखात्यानेही तसे आदेशही दिले आहेत.
मालेगाव येथील नाशिक मर्चंट को-ऑप. बँकेत काही बेरोजगार तरुणांच्या बँक खात्यात कोट्यवधी रुपये आले होते. संबंधित खातेधारकांना पैसे कुठून आले याची माहिती नव्हती. या प्रकाराची वाच्यता झाल्यानंतर बँक प्रशासनाने तपास करीत व्यवहारांची छाननी केली. तसेच मालेगाव छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपासास सुरुवात केली. त्यावेळी हा व्यवहार 100 कोटी रुपयांहून अधिकचा असल्याचे समोर आले.
दरम्यान, सोमय्या यांच्या आरोपानुसार आर्थिक गैरव्यवहाराचा आकडा 1 हजार कोटी रुपयांहून अधिकचा असून बेनामी कंपन्याच्या नावे हे पैसे 21 राज्यांमधून फिरवण्यात आले. संशयित सिराज मोहमंद याच्या बेनामी रेड रोझ ट्रेडींग कंपनीत ऑक्टोबर महिन्यात 104 शेल कंपनीज- फर्मस् मधून 21 राज्यातून 16 कोटी 49 लाख 63 हजार 845 रुपये आले होते. तसेच हे पैसे हवाला मार्गे मोहमंद भागड या संशयितास वर्ग करण्यात आल्याचे सोमय्या यांनी सांगितले.
या कोट्यवधी रुपयांमधील काही पैसे अंमली पदार्थ खरेदी-विक्री, टेरर फंडींग, ऑनलाइन जुगार, वोट जिहादसाठी वापरल्याचे बोलले जात आहे. त्याचप्रमाणे या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांसह ईडी, आयकर विभाग, गुप्तचर विभाग, जीएसटी विभागांसह दहशतवाद विरोधी पथकही सहभागी होत आहे. त्यामुळे या गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.