मुंबई : गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी जॉन पिंटो, राम कनोजिया आणि विशु प्रभात डे या त्रिकुटाविरुद्ध गोरेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या तिघांनी आतापर्यंत नऊजणांची सतरा लाख साठ हजाराची फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. फसवणुकीचा हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
यातील तक्रारदार मुलुंडचे रहिवाशी असून ते वैद्यकीय सल्लागार म्हणून तर त्यांची पत्नी वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहे. नोव्हेंबर २०२४ रोजी त्यांची राम कनोजियाशी एका कार्यक्रमांत ओळख झाली होती. त्याने तो शेअरमार्केट आणि प्रॉपटी गुंतवणूक क्षेत्रात कामाला असल्याचे त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता.
काही दिवसांनी त्याने जॉन आणि विशु यांच्यासोबत त्यांची ओळख करुन दिली होती. त्यांनी त्यांची सारथी इंडिया रियलिटी टेंडर्स नावाची कंपनी असून या कंपनीत गुंतवणुक केल्यास त्यांना चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. गोरेगाव येथील कंपनीत तीन लाखांची गुंतवणूक केली होती.
या सर्वांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी गोरेगाव पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला होता. त्यानंतर त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी जॉन पिंटो, राम कनोजिया आणि विशु डे या तिघांविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत तिन्ही आरोपींना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
ठरल्याप्रमाणे त्यांनी त्यांना काही महिने परतावा दिला, मात्र नंतर त्याने परताव्याची रक्कम देणे बंद केले. चौकशीदरम्यान या तिघांनी अशाच प्रकारे अनेकांना कंपनीत गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करुन त्यांची फसवणूक केल्याचे समजले. नोव्हेंबर ते डिसेंबर २०२४ या कालावधीत त्यांच्या कंपनीत नऊजणांनी १७लाख ६० हजाराची गुंतवणूक केली होती. त्यांना काही महिने परताव्याची रक्कम दिल्यानंतर त्यांनी ती रक्कम देणे बंद केले होते.