नंदुरबार : जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिस प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे. जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच एका सराईत गुन्हेगारांच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) 1999 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील गुन्हेगाऱ्यांमध्ये दहशत निर्माण होण्याची शक्यता आहे.
मोक्का अंतर्गत अटकेत आलेल्या टोळीचा प्रमुख राज्या ऊर्फ नागेश ऊर्फ नाकक्षा दमण्या वळवी (वय 27, रा. कात्री, ता. धडगाव) असून त्याच्यासह उमेदसिंग ऊर्फ उमेद ऊर्फ उमदया गोविंदसिंग पाडवी (वय 27, रा. काठी पाटपाडा, ता. अक्कलकुवा) आणि इतर चार साथीदारांचा समावेश आहे.
या टोळीविरोधात नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये तसेच गुजरात राज्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये घातक शस्त्र बाळगणे, दरोडा, खुनाचा प्रयत्न, घरफोडी, मारहाण व धमकी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. आरोपी जामिनावर सुटल्यावर पुन्हा गुन्हे करून कायद्याचा अनादर करत होते.
पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस आणि अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांनी ही कारवाई पार पाडली. संबंधित गुन्ह्यात (गु.र.क्र. 51/2025, कलम 310(2), 111, 281 इ.) मोलगी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या प्रकरणावरून मोक्का अंतर्गत प्रस्ताव तयार करण्यात आला होता. विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी यास मंजुरी दिली. शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार (अक्कलकुवा अति. कार्यभार) हे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.