

नाशिक : एप्रिल २०२५ मध्ये काठे गल्ली सिग्नलवरून कार डेकाॅर व्यावसायिकाचे अपहरण करून बंदुकीचा धाक दाखवून पंधरा लाख रुपयांची खंडणी उकळणारा समीर पठाण, प्रणव बाेरसे उर्फ माेहम्मद आमीन बाेरसेसह आठ जणांवर वरील गुन्ह्यात माेक्कान्वये कारवाई करण्यात आली आहे. पाेलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी याबाबतचे आदेश काढले असून तपासाच्या सूचना सरकारवाडा विभागाच्या सहायक आयुक्तांना केल्या आहेत.
मोहम्मद अन्वर सय्यद (३०), सादिक लतीफ सय्यद (३९), अहमद उर्फ एजाज रहिंग शेख (२५), अलफरान अश्पाक शेख (२५), समीर नासीर पठाण (३४), गुफरान अय्यूब तांबोळी (३७), प्रणव बोरसे उर्फ मोहमंद आमीन तुकाराम बोरसे (३४) आणि साकीर नासीर पठाण (३६, सर्व रा. वडाळागाव) अशी संशयितांची नावे आहेत. त्यातील साकीर हा गुन्हा घडल्यापासून अद्याप फरार आहे. निखील प्रदीप दर्यानानी (२७, रा. टाकळीरोड) यांचे चार एप्रिलला दुपारी सव्वा तीन वाजता अपहरण झाले होते.
त्यांनी अपहरणकर्त्यांना एक कोटी रुपयांपैकी १५ लाख रुपयांची खंडणी दिल्यानंतर अपहरणकर्त्यांच्या तावडीतून अंबड परिसरातून सुटका केली हाेती. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे प्रभारी मधुकर कड व पथकाने तपास करून संशयितांची धरपकड केली. त्यात दर्यानानी यांच्या बंधूंच्या दुकानात संशयित अलफरान शेख व अहमद शेख हे दोन संशयित कामास होते. त्यांनीच इतर संशयितांना दर्यानानी यांचे अपहरण करून खंडणी मागण्याचा कट रचण्यास सांगितले. त्यानुसार, पाेलिसांनी तपास करून सादिक सैय्यद याच्याकडून दोन लाख ८८ हजार रुपयांची रोकड व मोबाइल असा तीन लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला हाेता.