गुन्हेगारी टोळीकडून लहान-मोठे व्यावसायिक व नागरिकांकडून खंडणी वसूल केली जाते
गुलशेरनगर मैला डेपो भागात पूर्ववैमनस्यातून सराईत गुंडासह तरुणावर गोळीबार व सशस्त्र हल्ला
शहरात टोळी युद्धाने पुन्हा डोके वर काढले की काय, अशी शंका
मालेगाव ( नाशिक ) : शहरातील गुलशेरनगर मैला डेपो भागात पूर्ववैमनस्यातून सराईत गुंडासह पाच जणांनी मंगळवारी (दि. 29) सायंकाळी तरुणावर सशस्त्र हल्ला केला. यातील दोघांनी थेट गोळीबार केल्याने दोन गोळ्या लागून हा तरुण गंभीर जखमी झाला. फारान हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर, प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्याला धुळे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. जखमी व संशयितांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. यामुळे शहरात टोळी युद्धाने पुन्हा डोके वर काढले की काय, अशी शंका आहे.
अनिस शेख रशीद असे गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो गुलशेरनगर भागात टपरीवर चहा पित असताना संशयित रब्बानी दादा (पूर्ण नाव समजू शकले नाही) हा पाच साथीदारांसमवेत तेथे आला. त्याच्या हातात कोयता, चॉपर व दांडके असल्याचे अनिसच्या भावाने सांगितले. हल्ला केल्यानंतर रब्बानीसह दोघांनी गोळीबार केला. यात एक गोळी अनिसच्या छातीत, तर दुसरी दंडाला लागल्याने तो गंभीर जखमी झाला. रब्बानी व त्याचे सहकारी परिसरातील लहान-मोठे व्यावसायिक व नागरिकांकडून खंडणी वसूल करतात. त्यांना हटकल्याने माझ्या भावावर गोळीबार झाल्याचे अनिसच्या भावाने सांगितले.
दोन दिवसांपूर्वी दोघांमध्ये वाद झाला होता. या प्रकरणी पोलिसांत तक्रारही दाखल झाली होती. या वादाचे पर्यावसन आज हल्ल्यात व गोळीबाराच्या घटनेत झाले. जखमी अनिसवरही काही गुन्हे दाखल आहेत. जखमी अनिसला परिसरातील कार्यकर्ते व त्याच्या नातेवाइकांनी फारान रुग्णालयात दाखल केले. येथे मोठा जमाव जमला होता. प्राथमिक उपचारानंतर त्याला धुळे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. या हल्ल्यातील मुख्य संशयित रब्बानी हा काही महिन्यांपूर्वीच कारागृहातून बाहेर आला आहे. तेव्हापासून तो हप्ते वसुली, खंडणी व दमबाजी करत असल्याची चर्चा आहे. पवारवाडी पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलिसांनी या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन परिसरात बंदोबस्त वाढवत संशयितांच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.