

नाशिक : महापालिकांचे प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्य शासनाने निर्गमित केलेले असताना निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये जिल्हा परिषदेच्या गट , गण रचना करण्याचे काम सुरू झाले आहे.
जिल्हा परिषदेचे चार गट होणार आहेत. मालेगाव, सुरगाणा व चांदवड तालुक्यातील प्रत्येकी एक गट वाढत असून, निफाड तालुक्यातील दोन गट कमी होणार आहे. गटांची पुनर्रचना करताना मालेगाव व निफाड तालुक्यातील गटांची तोडफोड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची प्राथमिक तयारी सुरू केली आहे. यावर, आयोगाने 29 मे रोजी व्हीडीओ काॅन्फरन्सव्दारे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत जिल्हा प्रशासनाकडे जिल्हा परिषदेच्या प्रारूप गट, गण रचना आराखडा तयार करून मागविले आहेत. या आदेशानंतर जिल्हा प्रशासनाने तालुकास्तरावर सूचना केल्या. त्यानुसार तालुकास्तरावर गट, गण रचना करण्याचे काम सुरू आहे.
जिल्हा परिषद सदस्यांची संख्या निश्चित करताना कमीत कमी 50 व जास्तीत जास्त 75 सदस्य संख्या असावी, असा नियम आहे. यात, गटाची लोकसंख्या निश्चित करण्याचे सुत्राप्रमाणे नाशिक जिल्हा परिषदेत गटसंख्या ही 74 ही निश्चित करावी अशा सूचना आहेत. त्यामुळे नवीन रचनेत 74 गट राहतील, असे निश्चित मानले जात आहे. निफाड तालुक्यातील पिंपळगाव ओझर यांचे नगरपंचायतींत रूपातंर झाल्याने या तालुक्यात दोन गट कमी होणार आहे. त्यामुळे पिंपळगाव व ओझरच्या ग्रामीण भागातील काही गावे ही चांदोरी, सुकाणे या गटांना जोडली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या गटातील काही गावे पुन्हा इतर गटांना जोडली जाऊ शकतात, असे बोलले जात आहे. परिणामी तालुक्यात आठ गट करताना गटांची बऱ्यापैकी पुनर्रचना होण्याचा अंदाज आहे. मालेगाव तालुक्यात एक गट वाढत असल्याने तालुक्यातील गटांची संख्या ही आठ होणार आहे. हा गट वाढविताना इतर गटातील काही गावे जोडून नवीन गट अस्तित्वात येणार आहे. सुरगाणा व चांदवड तालुक्यात प्रत्येकी एक गट वाढत आहे. हे गट सन 2022 मध्ये केलेल्या गट रचनेप्रमाणे असतील, असा अंदाज व्यक्त केला आहे.