मालेगाव (नाशिक) : शहर व परिसरात यंत्रमाग कारखान्यातून वीजपंप चोरी करणारे दोन सराईत चोरटे तसेच येथील स्टार हॉटेलसमोरील स्टील दुकानात घरफोडी करणार्या चार चोरट्यांच्या टोळीला पवारवाडी पोलिसांनी शिताफीने सापळा रचून अटक केली. पोलिसांनी या सहा चोरट्यांकडून पावणेदोन लाखांचे वीजपंप, 70 हजारांची दुचाकी व एक लाख 96 हजार रुपये रोख असा सुमारे चार लाख 42 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.
जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी शहरातील गुन्हे उघडकीस आणण्यासाठी कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर अपर पोलिस अधीक्षक तेगबिरसिंह संधू, सहायक पोलिस अधीक्षक सिद्धार्थ बरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पवारवाडीचे पोलिस निरीक्षक राहुल खताळ व सहकारी लूम चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करीत असताना खात्रीलायक माहिती मिळाली असता, पथकाने स्मश तरबेज सलीम अहमद व मोहमद सामीक मोहमद शोएब यांना अजीज कल्लू स्टेडियम परिसरात सापळा रचून ताब्यात घेतले. चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखविताच लूम मोटार व दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. संशयितांनी 88 यंत्रमाग वीजपंप, 70 हजारांची बर्गमॅन दुचाकी चौकशीत जप्त केली.
दरम्यान, पवारवाडी पोलिसांच्या याच पथकाने सद्दाम शेख शब्बीर (रा. सैयद पार्क) जाहीब मंजूर खान उर्फ लख्खा (रा.जाफरनगर) नूर मोहमद अकबर खान (रा. आयशानगर) ताहीर अख्तर अब्दुल रशीद (रा. मिल्लतनगर) यांना चौकशीसाठी अटक केली असता, त्यांनी स्टार हॉटेलसमोरील स्टील दुकान फोडल्याची कबुली दिली. त्यांच्या जवळून एक लाख 96 हजार रुपये रोख जप्त करण्यात आले.
निरीक्षक राहुल खताळ, सहायक पोलिस निरीक्षक किरण पाटील, हवालदार राकेश उबाळे, संतोष सांगळे, नीलेश निकम, उमेश खैरनार, विनोद चव्हाण, नवनाथ शेलार, सचिन राठोड आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
वीजपंप चोरी व घरफोडी करणार्या टोळीला अटक केल्यामुळे दोघांचे चार घरफोडी व एक दुचाकी चोरी असे पाच, तर अन्य चौघांकडील पाच घरफोडी व एक दुचाकी चोरी असे एकूण 11 गुन्हे उघडकीस आले आहेत.