अधिक परतावा, खात्रीशीर नफा आणि जलद कमाई या आकर्षक आमिषाला बळी पडत एका महिलेची ऑनलाइन फसवणूक झाली Pudhari News Network
क्राईम डायरी

Lured with High Returns : शेअर बाजारात 'सोन्याच्या स्वप्ना'त अडकली महिला

'हाय रिटर्न'च्या आमिषाने १ कोटी ७७ लाखांची फसवणूक

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : अधिक परतावा, खात्रीशीर नफा आणि जलद कमाई या आकर्षक आमिषाला बळी पडत एका महिलेची तब्बल एक कोटी ७७ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. विशेष म्हणजे फसवणूक सुरू असतानाच नातेवाईकाने वारंवार सावधगिरीचा इशारा दिला होता. मात्र, 'नफ्याच्या मोहात' त्या सूचनांकडे दुर्लक्ष झाल्याने अखेर मोठा आर्थिक आघात सहन करावा लागला.

पीडित महिला समाजमाध्यमांवरील एका लिंकच्या माध्यमातून शेअर बाजारात अधिक परतावा मिळवून देणाऱ्या व्हॉट्सॲप ग्रुपशी जोडली गेली. या ग्रुपवर रोज विविध गुंतवणूक योजनांची माहिती, नफ्याचे आकडे आणि आकर्षक परताव्याची आश्वासने दिली जात होती. त्यावर विश्वास ठेवत महिलेने हळूहळू मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. सुरुवातीला परतावा मिळत असल्याचा भास निर्माण करण्यात आला. मात्र, हा परतावा थेट खात्यात जमा न होता केवळ मोबाइलच्या स्क्रीनवर दिसत होता.

काही दिवसांनी ही बाब महिलेने आपल्या नातेवाइकास सांगितली. त्यांनी तत्काळ हा प्रकार फसवणुकीचा असल्याचा संशय व्यक्त करत व्यवहार थांबवण्याचा सल्ला दिला. मात्र, सगळं व्यवस्थित सुरू आहे, या विश्वासावर महिलेने तो सल्ला दुर्लक्षित केला आणि गुंतवणूक सुरूच ठेवली. अखेर जेव्हा रक्कम काढण्याची वेळ आली तेव्हा फसवणूक करणाऱ्यांनी नवा डाव टाकत '१५ टक्के अतिरिक्त कर भरल्याशिवाय रक्कम मिळणार नाही' असे सांगितले. महिलेने जमा रकमेतीलच कर वजा करत उर्वरित रक्कम देण्याची विनंती केली. मात्र, सरकारी नियमानुसार आधी कर भरणे बंधनकारक आहे, असे सांगून तिला अधिक रक्कम भरण्यास भाग पाडले. त्यानंतर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता सर्वच क्रमांक व ऑनलाइन संपर्क अचानक बंद झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ज्या नातेवाइकाचा सल्ला पूर्वी दुर्लक्षित केला होता त्याच्यासोबत महिला सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास हजर झाली. या प्रकरणाचा पुढील तपास सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पिसे करत आहेत. दरम्यान, ऑनलाइन शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली दिल्या जाणाऱ्या अवास्तव परताव्याच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नागरिकांनी अशा योजनांबाबत सतर्क राहावे, असेही नमूद करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT