नाशिक : रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या आमिषाने मुंबईस्थित मामाने नाशिकमध्ये राहणार्या बेरोजगार भाच्याला सुमारे 14 लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तीन ते चार वर्षे उलटूनही नोकरी न लागल्याने तसेच दिलेले धनादेश बँकेतून न वटल्याने अखेर भाच्याने आडगाव पोलिस ठाण्यात मामासह इतर दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आडगाव पोलिस ठाणे हद्दीत राहणारा बेरोजगार उज्ज्वल गोसावी यांना ठाणे येथे राहणारे त्यांचे मामा महेश गोसावी यांच्यासह नीलकंठ गोसावी आणि प्रिया गोसावी यांनी रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवत 14 लाख रुपयांची मागणी केली. ठरल्याप्रमाणे उज्ज्वल यांनी मामासह इतर दोघांकडे 14 लाख रुपयांची रक्कम सुपूर्द केली. काही काळानंतर मामाने बनावट नियुक्तिपत्र देऊन उज्ज्वल यांना प्रथम दिल्ली व नंतर प्रयागराज येथे ट्रेनिंगसाठी पाठविले. मात्र, दोन्ही ठिकाणी त्यांना नियुक्तिपत्र खोटे असल्याचे समोर आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने उज्ज्वल यांनी मामाकडे पैसे परत देण्याची मागणी केली. नोव्हेंबर 2022 मध्ये मामा महेश गोसावी यांनी उज्ज्वल यांना धनादेश दिला मात्र, तो बँकेत न वटल्याने पुन्हा साई इन्फोटेक या फर्मच्या नावे दुसरा धनादेश दिला. मात्र, ताेही न वटल्याने अखेर उज्ज्वल यांनी आडगाव पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद नोंदवली आहे. या प्रकरणी अधिक तपास उपनिरीक्षक निकम करीत आहेत.