

नाशिक : प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना आणि शबरी आवास योजनेंतर्गत मंजूर घरकुलासाठी पाच ब्रास वाळूची वाहतूक करण्यासाठी 25 हजारांची लाच घेताना संगमनेर तालुक्यातील कनोली येथील तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली.
कनोली हद्दीत तक्रारदारांस प्रधानमंत्री, रमाई आणि शबरी योजनेंतर्गत घरकुलासाठी पाच ब्रास वाळू मंजूर होती. या वाळूची वाहतूक सुरू असताना तलाठ्याने 30 हजारांच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर तडजोडीअंती 25 हजारांची लाच घेताना सोमवारी (दि.7) तलाठी संतोष बाबासाहेब शेलार (रा. कनोली, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) यास एसीबी पथकाने रंगेहाथ अटक केली.