सकाळ सकाळी आदित्यने मोबाईल हातात घेतला. ई-मेल इनबॉक्स उघडला आणि त्याच्या समोर एक संदेश चमकला, ‘अभिनंदन आदित्य, तुम्ही 5 मिलियन डॉलर्स जिंकले आहेत!’ त्याने क्षणभर डोळे चोळले; पण स्क्रीनवर चमकणार्या मोठ्या अक्षरांनी मनात वादळ उठवले. पाच मिलियन डॉलर म्हणजे तब्बल चाळीस कोटी रुपये! आयुष्यच बदलून टाकणारी रक्कम!
मेल वाचताना आदित्यच्या चेहर्यावर नकळत हास्य उमटले. पाठवणार्याने स्वतःला इंटरनॅशनल लॉटरी बोर्डचा प्रतिनिधी म्हणून ओळख करून दिली होती आणि पुढे लिहिले होते की, ‘ही रक्कम त्याच्या खात्यात टाकण्यासाठी फक्त 250 डॉलरची प्रोसेसिंग फी भरावी लागेल.’ रक्कम इतकी प्रचंड की, ही फी अगदीच किरकोळ भासली. कोणताही विचार न करता त्याने ताबडतोब यूपीआयद्वारे रक्कम ट्रान्स्फर केली.
दुसर्याच दिवशी आणखी एक मेल आला. यावेळी सांगितले गेले की, रक्कम कस्टममध्ये अडली आहे आणि ती सोडवण्यासाठी 15,000 रुपये कर भरावा लागेल. आदित्यला थोडी शंका आली खरी; पण लोभाने शंकेचा गळा घोटला. त्याने लगेच पैसे भरले. नंतर फॉरेन करन्सी एक्स्चेंज चार्जेस, इन्श्यूरन्स अशा एकामागून एक नव्या कारणांसाठी मेल्स येऊ लागले. प्रत्येक वेळी आदित्य पैसे भरत राहिला. कारण, त्याला खात्री होती की, आता खात्यात डॉलर पडणारच.
अशाप्रकारे तीन महिन्यांत आदित्यच्या खात्यातून तब्बल 2.45 लाख रुपये गेले; पण डॉलर मात्र कुठेच आले नाहीत. मग, अचानक मेल्स येणे थांबले, फोन क्रमांक बंद झाले, तेव्हाच आदित्यच्या काळजाचा ठोका चुकला. तो सायबर चोरट्यांच्या सापळ्यात अडकला होता.
हा सगळा प्रकार आहे लॉटरी व प्राईझ मनी स्कॅमचा. सायबर चोरटे असे फेक ई-मेल मेसेज पाठवून अनेकांना गंडा घालत आहेत. ई-मेल्स परदेशी सर्व्हरवरून आलेले असतात. बनावट नावाने उघडलेली भारतीय बँक खाती, बनावट वेबसाईटस् आणि लोगो वापरून विश्वास निर्माण करणारे संदेश पाठवले जातात. पैसे मिळताच काही तासांत ते परदेशात ट्रान्स्फर केले जात. अशा फसवणुकीत लोकांच्या लालसेचा वापर केला जातो. पहिल्यांदा लहान रक्कम मागून विश्वास जिंकला जातो आणि नंतर सतत नवनवीन कारणांनी पैसे उकळले जातात.
कधी तुमच्या ई-मेल अकाऊंटमधील काँन्टॅक्ट लिस्ट हॅक करून तुमच्या नावाने सर्वांना मदतीचे मेल्स पाठवले जातात. मी हॉस्पिटलमध्ये अडकलोय, मदत हवी आहे. कधी फॉरेन गिफ्ट पॅकेज कस्टममध्ये अडकलेय म्हणून पैसे मागतात, तर कधी कधी बेकायदेशीर पैसे ट्रान्स्फरची ऑफर देतात.
त्यामुळे लक्षात ठेवा लॉटरी स्कॅम टाळण्यासाठी तुम्ही लॉटरी जिंकली आहे असा कुठलाही ई-मेल/एसएमअस आल्यास त्याकडे दुर्लक्ष करा. अनोळखी लिंक, अटॅचमेंट कधीही उघडू नका. वैयक्तिक किंवा बँक माहिती शेअर करू नका. मोठा नफा मिळेल या अपेक्षेने कधीही अनोळखी खात्यात पैसे ट्रान्स्फर करू नका.