मालेगाव (नाशिक) : खोट्या कागदपत्रांच्या आधारे 550 जणांनी बनावट जन्मदाखले मिळवून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप करत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत आरोपींची संख्या हजारांवर जाणार असल्याची शक्यता भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी व्यक्त केली.
बनावट जन्मदाखले प्रकरणी भाजप नेते सोमय्या यांनी गुरुवारी (दि.11) मालेगावी आले होते. यावेळी त्यांनी छावणी, किल्ला पोलिस ठाणे व अपर पोलिस अधीक्षक कार्यालयात अधिकार्यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी सोमय्या यांनी अपर पोलिस अधीक्षक तेगबीरसिंग संधू यांच्याकडे 550 बोगस जन्मदाखले प्रकरणांचे पुरावे सादर केले. या प्रकरणात यापूर्वीही सोमय्या यांनी एक हजार 44 बनावट जन्मदाखल्यांचा दावा केला होता. ज्यामुळे चार गुन्हे दाखल झाले आणि काही जणांना अटकही झाली.
मालेगावात अशा प्रकारे सुमारे चार हजार बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांनी बनावट दाखले मिळवल्याचा आरोप त्यांनी केला होता. या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात आली. एसआयटीने एकही बांगलादेशी किंवा रोहिंग्या नसल्याचा अहवाल शासनाला दिला आहे. याबाबत सोमय्या यांना पत्रकारांनी विचारणा केली असता त्यांनी याबाबत बोलणे टाळले. या प्रकरणात दोन महापालिका अधिकारी आणि नायब तहसीलदारसह चार महसूल कर्मचार्यांवर निलंबनाची कारवाई झाली आहे.