नोकरी देण्याच्या नावाखाली फसवणूक Employment Fraud (File Photo)
क्राईम डायरी

Job Fraud | नोकरी देण्याच्या नावाखाली फसवणूक

Youth Job Scam | सध्या नोकरी शोधणार्‍या तरुणांची संख्या झपाट्याने वाढली असल्याचे दिसून येते.

पुढारी वृत्तसेवा

सध्या नोकरी शोधणार्‍या तरुणांची संख्या झपाट्याने वाढली असल्याचे दिसून येते. मात्र, याच गोष्टीचा फायदा उचलून ठाणे-मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये अनेक बोगस प्लेसमेंट कंपन्या तरुणांना नोकरी देण्याच्या नावाखाली आर्थिक पिळवणूक व फसवणूक करीत असल्याचे समोर येत आहे.

प्लेसमेंट कंपनीच्या नावाखाली गंडवणारी मंडळी फसवणुकीच्या नवनवीन कल्पना शोधून काढतात. मनपसंत जॉब, घरी बसून काम, ऑनलाईन वर्क अशा अनेक भूलथापा ही मंडळी देतात. प्लेसमेंट कंपनीत येणार्‍या तरुणांकडून प्रथम काही हजाराची नोंदणी फी घेतली जाते. नोकरीसाठी बेरोजगार तरुण-तरुणी ही फी सहज भरण्यास तयार होतात. परंतु ही नोंदणी फी भरल्यानंतर सुरू होतो खरा फसवणुकीचा बाजार. एकदा का या प्लेसमेंट कंपन्यांमध्ये नाव नोंदणी केले की मग ट्रेंनिग, सेमिनार, बड्या कंपन्यांची मेंबरशिप अशी विविध खोटी कारणे सांगून या कंपन्या बेरोजगारांना गंडवणे सुरू करतात आणि हजारो/लाखो रुपये उकळतात. ही आर्थिक पिळवणूक तोपर्यंत सुरूच असते, जोपर्यंत आपली फसवणूक होत असल्याचे उमेदवाराच्या लक्षात येत नाही.

एकदा का आपली फसवणूक झाली हे लक्षात आले की, या प्लेसमेंट कंपन्या त्या उमेदवारांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकतात आणि त्यांचे फोन घेणे बंद केले जाते. फसवणूक झालेला उमेदवार आपले पैसे परत मागण्यास गेला तर त्यास धमकावले जाते. अश्लील शिव्या दिल्या जातात. पुढे हे प्रकरण पोलिसात गेलेच तर पोलिसांना मॅनेज करून सारे आलबेल केले जाते. हा प्रकार गेल्या काही वर्षांपासून असाच अविरत सुरू आहे. ठाणे व मुंबईतील बहुतेक रेल्वे स्थानकाबाहेरच्या परिसरात असलेल्या इमारतींमध्ये अशी अनेक फसवणूक करणारी प्लेसमेंट कंपन्यांची कार्यालये आहेत. त्यापैकी काहींच्या तक्रारी पोलिस स्टेशनपर्यंतदेखील गेल्या आहेत. परंतु मोठी फसवणूक नसल्याचे सांगून पोलिस अशा तक्रारी नोंदवूनच घेत नाहीत किंवा वेळीच सेटलमेंट करून हे प्रकरण दाबले जाते. शंभरातून एखादा उमेदवार पोलिस स्टेशनपर्यंत जातो.

खर्‍या अन् खोट्या कंपन्या कोणत्या?

नोकरी देणार्‍या सार्‍याच कंपन्या बनावट व फसवणूक करणार्‍या असतात असे मुळीच नाही. पण या बनावट प्लेसमेंट कंपन्या गल्लोगल्ली उगवल्याने त्यात खर्‍या कंपन्या कोणत्या अन् खोट्या कोणत्या हेच ठरवणे मुश्कील ठरते. त्यामुळे खर्‍या प्लेसमेंट कंपन्यांनीदेखील एकजूट होऊन बनावट प्लेसमेंटवाल्यांचा फसवणुकीचा हा बाजार थांबवण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय. दरम्यान, सुशिक्षित तरुणांनी कुठेही नोकरी शोधताना सावधानता बाळगली पाहिजे. पैसे भरून नोकरी मिळेल अशा भूलथापा देणार्‍या लोकांची माहिती त्वरित पोलिसांना कळवावी असे आवाहन पोलिस वेळोवेळी सोशल मीडिया व त्यांच्या वेबसाईटवर करीत असतात.

विदेशात नोकरीचे आमिष

प्लेसमेंट कंपनीच्या नावाखाली गंडवणारी मंडळी घरबसल्या काम, पार्ट टाइम काम, ऑनलाईन जॉब वर्क अशा अनेक प्रकारे बेरोजगारांना आकर्षित केले जाते. त्यातही विदेशात नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली अनेकांना फसवले जाते. विदेशातील शिपिंग कँपनी, मॉल, हॉटेल्स मध्ये हमखास नोकरी मिळवून देतो अशी थाप ही मंडळी मारतात व तशी जाहिरात देखील करतात. या जाहिराती बघून आलेल्या बेरोजगार तरुणांकडून ही मंडळी इमिग्रेशन, व्हीजा व इतर दस्तावेज बनवण्याचा नावाखाली हजारो - लाखो रुपये लुबाडतात. इतके करून देखील नोकरी तर मिळत तर नाहीच पण तुमचा सिबील खराब आहे, तुमच्या नावावर पोलिसात तक्रार आहे, अशी विविध कारणे दाखवून नोकरी मिळणार नाही असे सांगून बेरोजगार तरुणांना खुलेआम फसवले जाते.

अशी होते फसवणूक

मुंबई नागपाडा येथील अयुब अन्सारी हे टॅक्सीचालक असून त्यांचा मुलगा अरबाझ (24) याला परदेशात नोकरी करण्याची इच्छा होती. त्यानुसार त्याने ठाण्यातील एका प्लेसमेंट कंपनीचा पत्ता मिळवला. त्यानंतर त्या स्नेहदीप इंटरप्रायजेस या प्लेसमेंट कंपनीशी संपर्क साधला असता साडेतीन लाखांत सिंगापूर येथील मॉलमध्ये एक लाख मासिक वेतनाची नोकरीला लावण्याचे आश्वासन त्यास देण्यात आले. मात्र ही रक्कम आवाक्याबाहेर असल्याने तडजोडीअंती अरबाझ याच्याकडून 2 लाख रुपये प्लेसमेंट कंपनीने स्वीकारले. मात्र बरेच महिने उलटूनदेखील अरबाझ यास व्हिसाही मिळाला नाही आणि नोकरीही मिळाली नाही. तेव्हा त्यांनी त्या प्लेसमेंट कंपनीकडे पैसे परत मिळावे म्हणून तगादा लावला. त्यानंतर त्या प्लेसमेंट कंपनीच्या महिला पदाधिकारी यांनी पैशाचा परतावा करण्यासाठी त्यांचा सहकारी फहीम खान याच्या नावाचा दोन लाखाचा धनादेश दिला. मात्र तो धनादेश बँकेत वटलाच नाही. त्यामुळे अन्सारी यांनी दोघांविरोधात चितळसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT