जळगाव : जिल्ह्यातील जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार सचिन ऊर्फ टिचुकल्या कैलास चौधरी (वय २६, रा. गणेशवाडी, तुकारामवाडी, जळगाव) याच्यावर एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत कारवाई करत त्याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
सचिन चौधरी याच्यावर जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध ९ गुन्हे दाखल आहेत. यामध्ये झोपडपट्टी दादा, हातभट्टी तयार करणे, अंमली पदार्थांचे बेकायदेशीर व्यवहार, व्हिडीओ पायरेसी, वाळू तस्करी व अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार यांसारख्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.
या पार्श्वभूमीवर, जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक राकेश मानगावकर यांनी महाराष्ट्र प्रतिबंधात्मक अधिनियम १९८१ (सुधारित २०१५) अंतर्गत "धोकादायक व्यक्ती" या संज्ञेत चौधरीचा प्रस्ताव तयार करून तो १६ जून रोजी स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव येथे सादर केला. त्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशानुसार, ३० जून रोजी चौधरीला नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.
ही कारवाई जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप ठाकूर, सहायक निरीक्षक संतोष चव्हाण, पोहेकॉ मिलिंद सोनवणे व विकास पोहेकर यांच्या पथकाने अंमलात आणली.
या आधीही चौधरीविरुद्ध वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या होत्या. मात्र, त्याने गुन्हेगारी प्रवृत्ती सोडली नसल्याने अखेर एम.पी.डी.ए. अंतर्गत ही कठोर कारवाई करण्यात आली.
या कार्यवाहीसाठी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पो.निरी. संदीप पाटील, पोहेकॉ सुनिल दामोदर पंडीत, जयंत चौधरी, रफिक शेख, संदीप चव्हाण यांचे विशेष सहकार्य लाभले.