

अमळनेर (जळगाव) : शहरातील गांधलीपुरा भागात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर अमळनेर पोलिसांनी छापा टाकून सहा पीडित महिलांची सुटका केली. तसेच देहविक्रीचा व्यवसाय चालवत असल्याप्रकरणी तिघी महिलांवर ‘पिटा ॲक्ट’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवार (दि.1) रोजी सायंकाळी ९ वाजता करण्यात आली.
पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना गांधलीपुरा परिसरात वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने पथकाला कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, पोलिसांनी घटनास्थळी डमी (बनावट) ग्राहक पाठवून खात्री घेतली. देहविक्रीसाठी १,००० रुपये घेतले जात असून, त्यातील ५०० रुपये पीडित महिलांना दिले जात असल्याचे उघड झाले.
पोलिसांनी तत्काळ छापा टाकत घटनास्थळावरून ६१ कंडोमची पाकिटे जप्त केली. यावेळी देहविक्रीसाठी अडकवून ठेवलेल्या सहा महिलांची सुटका करण्यात आली. या महिलांना जबरदस्तीने अनैतिक व्यवसायात ढकलल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी जुमाबाई (पूर्ण नाव अज्ञात), शशिकला मदन बडगुजर (वय ३०) आणि मीना दीपक मिस्तरी (वय ६०), सर्व रा. गांधलीपुरा, यांच्याविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात ‘पिटा ॲक्ट’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.