जळगाव : यावल तालुक्यातील दोनगाव शिवारात प्रमोद श्रीराम बाविस्कर यांच्यावर गोळीबार करून खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अत्यंत कौशल्याने करत पाच आरोपींना अटक केली असून यामध्ये पुनगाव (ता. चोपडा) येथील सरपंचाचा समावेश असल्याची धक्कादायक बाब समाेर आली आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार १० जुलै रोजी रात्री ९ वाजता हॉटेल रायबा परिसरात अज्ञात व्यक्तीने बंदुकीने गोळीबार करून प्रमोद बाविस्कर यांना गंभीर जखमी केले. हल्लेखोर अनोळखी साथीदारासह मोटारसायकलवरून पसार झाला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु सुरुवातीला आरोपींचा थांगपत्ता लागत नव्हता.
या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवला. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, सोपान गोरे आणि शरद बागल यांच्या नेतृत्वाखाली दोन विशेष तपास पथके तयार करण्यात आली. त्यानंतर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध घेऊन नाशिक, उमर्टी आणि अडावद येथे छापे टाकून तब्बल पाच आरोपींना अटक करण्यात आली. यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे पुनगावचे सरपंच किशोर मुरलीधर बाविस्कर (वय ४०) यांचा देखील समावेश असल्याचे समोर आले. त्यासोबतच दर्शन रविंद्र देशमुख (वय २५), गोपाल संतोष चव्हाण (वय २५) , विनोद वसंतराव पावरा (वय २२), सुनिल सुभाष पावरा (वय २२) या सर्व संशयित आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, गुन्ह्यात वापरलेली बंदूक आणि मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
प्रमोद बाविस्कर यांचा भाऊ याने काही वर्षांपूर्वी जीवनयात्रा संपवली होती. त्यास प्रवृत्त केल्याचा संशय किशोर बाविस्कर व त्याच्या भावावर होता. राजकीय व वैयक्तिक वैमनस्य, हेही हल्ल्याचे प्रमुख कारण असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.
किशोर बाविस्कर याने शुभम देशमुख याला खून करण्याची सुपारी दिली. शुभमने गोपाल चव्हाण सोबत रेकी करून प्रमोद बाविस्कर यांची हालचाल समजून घेतली. नंतर उमर्टी गावातील विनोद व सुनील पावरा या दोघांना हल्ल्यासाठी तयार केले. या कारवाईसाठी किशोरने शुभमला फोनपे द्वारे पन्नास हजार ट्रान्सफर केल्याचेही तपासात निदर्शनास आले आहे.
एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील, रंगनाथ धारबळे, यावल पोलीस स्टेशनचे अजयकुमार वाढवे, बाबासाहेब पाटील यांच्यासह शरद बागल, सोपान गोरे, जितेंद्र वाल्टे, सुनिल दामोदरे, प्रितम पाटील, यशवंत टहाकळे, मुरलीधर धनगर, प्रविण भालेराव, विलेश सोनवणे, संदीप चव्हाण, बबन पाटील, सिध्देश्वर डापकर, रावसाहेब पाटील, ईश्वर पाटील, गोपाल पाटील, महेश सोमवंशी, संदीप सूर्यवंशी, किशोर परदेशी, सचिन पाटील, योगेश खोंडे, भरत कोळी, सागर कोळी यांनी ही कारवाई पार पाडली. पोलीस अधीक्षकांनी या यशस्वी तपासासाठी तपास पथकाचे कौतुक केले असून गुन्ह्याचा सखोल तपास सुरु असून, या प्रकरणी आणखी आरोपी समोर आल्यास त्यांना देखील लवकरच अटक होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे.