जळगाव : भुसावळ तालुका पोलिसांनी शहरातील २५ लाख ४२ हजार रुपयांच्या लुटीचा छडा अवघ्या ४८ तासांत लावत सहा आरोपींना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, लुट झालेल्या रॉयल कंपनीचाच ड्रायव्हर शाहीद बेग हा या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी आरोपींकडून २३ लाख ४२ हजार रुपये रोख रक्कम जप्त केली असून, त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
२८ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे १०:२० वाजता फिर्यादी मोहम्मद यासीन इस्माईल (रॉयल कंपनीचे कर्मचारी) हे कार्यालयातील २५ लाख ४२ हजार रुपये बॅगेत घेऊन मोटारसायकलवर घरी जात होते. मौजे खडके शिवारातील सत्यसाईनगरकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर तिघा अनोळखींनी मोटारसायकलला धक्का देऊन पैशांची बॅग हिसकावली आणि पळ काढला. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याची गंभीरता आणि मोठी रक्कम लक्षात घेऊन उपविभागीय अधिकारी संदीप गावित, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या तपासादरम्यान रॉयल कंपनीचा ड्रायव्हर शाहीद बेग इब्राहिम बेग (वय २५, रा. भुसावळ) याला संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले होते. त्याने चौकशीत लुटीचा कट रचल्याची कबुली दिली असून कंपनीतील पैशांच्या हालचाली आणि मार्गाची अचूक माहिती असल्याने त्याने गुन्ह्याचे नियोजन केले होते.
या गुन्ह्यात पोलिसांनी शाहीद बेग इब्राहिम बेग (२५, रा. भुसावळ) – मुख्य सूत्रधार, मुजाहिद आसिफ मलिक (२०) , मोहम्मद दानिश मोहम्मद हाशिम (१९), अजहर करीम मलिक (२४, रा. रसलपूर, ता. रावेर), अमीर खान विनोद खान (२४, रा. रसलपूर, ता. रावेर), इजहार बेग इरफान बेग (२३, रा. रसलपूर, ता. रावेर) या आरोपींकडून २३ लाख ४२ हजार रुपये जप्त करण्यात आले असून, उर्वरित दोन लाख रुपये हस्तगत करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. न्यायालयाने सर्व आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय अधिकारी संदीप गावित, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, आणि पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.
या तपासात श्रेणी पोलीस उपनिरीक्षक रवी नरवडे, गोपाल गव्हाणे, उमाकांत पाटील, प्रेमचंद्र सपकाळे, श्रीकृष्ण देशमुख, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे, ईश्वर पाटील, दर्शन ढाकणे (भुसावळ पोलिस), तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पूजा अंधारे, संजय ताडे, वाल्मीक सोनवणे, सुधीर विसपुते, जितू ठाकरे, योगेश माळी, भूषण चौधरी, अमर अढाळे, प्रशांत सोनार आणि रावेर पोलीस ठाण्याचे प्रमोद पाटील यांनी सहभाग घेतला. तर या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी संबंधित पथकाला रोख बक्षीस देखील प्रदान केल्याचे समजते.