जळगाव : जिल्ह्यातील सर्व 15 तालुक्यांत चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असल्याने नागरीकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून बांधकाम साहित्य, मोटरसायकल, जनावरे, बकऱ्या अशा विविध वस्तूंची होतच आहे. मात्र पोलिस व स्थानिक गुन्हे शाखा चोरट्यांवर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरत असल्याचे दुर्देवी चित्र दिसून येत आहे.
स्थानिक गुन्हे शाखेत अधिकाऱ्यांचे लफडे उघड झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तडकाफडकी बदली केली. तरीही परिस्थितीत काहीही बदल झालेला दिसून येत नाही. फक्त अधिकारी बदलले, पण गुन्हेगारीत घट झालेली दिसून येत नाही. परिणामी, जिल्हाभरात चोरट्यांना मोकळीक मिळत असून सर्रासपणे चोरीच्या घटनांची मालिकाच सुरु असल्याचे समोर येत आहे.
कानळदा, जळगाव तालुका: मिलिंद गोकुळ कंखरे यांच्या शेतातून 88 हजार रुपयांच्या बकऱ्यांची चोरी झालेली आहे (गुन्हा नोंद: 2 सप्टेंबर, 2025)
अमळनेर: नगरपालिकेचे कर्मचारी विजय महाजन यांची वीस हजारांची मोटरसायकल चोरी.
पाचोरा तालुका: सुरेश निकुंभ यांच्या घरातील गोदरेज कपाटातून 23 हजार रुपये रोख रक्कम लंपास.
जळगाव शहर, हरी ओम नगर: प्लॉटवरील शोरूममधून 18 हजार रुपयांचे लोखंडी प्लेट्स चोरी.
पारोळा तालुका, तामसवाडी: 32 हजार रुपयांची बजाज कंपनीची दुचाकी चोरी.
या घटनांनुसार सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात चोरीचे सत्र सुरुच असल्याचे समोर येत आहे. दररोज कुठे ना कुठे चोरटे सक्रिय असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदवले जात असले तरी चोरट्यांना पकडण्यात यश आलेले दिसून येत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.