सहज मिळणार्या पैशांचा मोह अनेकांना आकर्षित करतो, पण हाच मोह तुम्हाला आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळीचा सदस्य बनवून तुरुंगाची हवा खायला लावू शकतो. सायबर गुन्हेगार आता सामान्य नागरिकांना ‘मनी म्यूल’ (Money Mule) अर्थात ‘पैशांचे वाहतूकदार’ बनवून त्यांच्या बँक खात्यांचा वापर काळा पैसा पांढरा करण्यासाठी करत आहेत. आर्थिक जगात वावरताना डोळे उघडे ठेवणे ही काळाची गरज आहे. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळ्या तुम्हाला ढाल बनवून आपले काळे धंदे चालवत आहेत. त्यामुळे, पैशांचा कोणताही व्यवहार करताना शंभर वेळा विचार करा. कारण, क्षणाचा मोह आणि अज्ञान आयुष्यभरासाठी डोकेदुखी ठरू शकते.
मारुती वि. पाटील, कोल्हापूर
‘वर्क फ्रॉम होम’ करून दिवसाला हजारो रुपये कमवा... सोशल मीडियावर ओळख झालेल्या व्यक्तीने मदतीच्या नावाखाली खात्यात पैसे पाठवले... आकर्षक बक्षीस जिंकल्याचा मेसेज आला... ही आणि अशी अनेक आमिषे आजकाल अनेकांना जाळ्यात ओढत आहेत. मात्र, या सहज वाटणार्या पैशांमागे एक मोठे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी जाळे असू शकते आणि तुम्ही नकळतपणे त्याचा भाग बनू शकता. या प्रकाराला ‘मनी म्यूल’ असे म्हटले जाते, ज्यात गुन्हेगार तुमच्या बँक खात्याचा वापर करून काळा पैसा पांढरा करतात आणि तुम्ही कायद्याच्या कचाट्यात सापडता.
‘मनी म्यूल’ म्हणजे अशी व्यक्ती, जी गुन्हेगारांकडून मिळवलेले बेकायदेशीर पैसे एका खात्यातून दुसर्या खात्यात हस्तांतरित करते. अनेकदा या व्यक्तींना आपण एका मोठ्या गुन्ह्यात सहभागी होत आहोत, याची कल्पनाही नसते. ऑनलाइन फसवणूक, ड्रग्ज आणि मानवी तस्करी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमधून मिळवलेला पैसा लपवण्यासाठी गुन्हेगार अशा सामान्य लोकांचा वापर करतात. तुमच्या खात्याचा वापर केवळ एक माध्यम म्हणून केला जातो, ज्यामुळे पोलिसांना पैशांचा मूळ स्रोत शोधणे कठीण होते.
गुन्हेगार अत्यंत हुशारीने लोकांना आपल्या जाळ्यात ओढतात. यासाठी ते विविध पद्धती वापरतात.
बनावट नोकरीच्या ऑफर्स: ‘वर्क फ्रॉम होम’ किंवा ‘पार्ट-टाईम जॉब’च्या नावाखाली तुम्हाला पैसे स्वीकारण्याचे आणि ते दुसर्या खात्यात पाठवण्याचे काम दिले जाते.
रोमान्स स्कॅम : सोशल मीडिया किंवा डेटिंग अॅपवर ओळख झालेली व्यक्ती प्रेमाचे नाटक करून, अडचणीचे कारण सांगून तुमच्या खात्यात पैसे पाठवते आणि ते पुढे पाठवण्यास सांगते.
लॉटरी किंवा बक्षीस जिंकल्याचे आमिष : तुम्हाला मोठे बक्षीस लागल्याचे सांगून, त्यातील काही रक्कम तुम्हाला ठेवून उरलेली रक्कम पुढे पाठवण्यास सांगितले जाते.
तुम्ही अजाणतेपणे ‘मनी म्यूल’ बनला असाल तरी, कायद्याच्या नजरेत तुम्ही गुन्हेगाराचे भागीदार ठरता. याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.
कायदेशीर कारवाई आणि तुरुंगवास : तुमच्यावर मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल होऊ शकतो, ज्यात तुरुंगवासाची आणि मोठ्या दंडाची तरतूद आहे.
बँक खाते गोठवणे : तुमचे बँक खाते गोठवले जाऊ शकते आणि भविष्यात तुम्हाला कर्ज मिळण्यास किंवा नवीन खाते उघडण्यास अडचणी येऊ शकतात.
आर्थिक नुकसान : अनेकदा गुन्हेगार तुमच्याकडूनच पैसे उकळतात किंवा तुमच्या खात्याचा गैरवापर करतात.
गुन्हेगारी नोंद : तुमच्या नावावर कायमची गुन्हेगारी नोंद होऊ शकते, ज्यामुळे तुमच्या भविष्यावर गंभीर परिणाम होतो.
अनोळखी व्यक्ती किंवा कंपनीसाठी तुमच्या बँक खात्यातून पैसे स्वीकारण्यास किंवा पाठवण्यास स्पष्ट नकार द्या.
सहज आणि भरपूर पैशांचे आमिष दाखवणार्या नोकरीच्या ऑफर्सपासून सावध राहा. कोणतेही कायदेशीर काम पैसे हस्तांतरित करण्यास सांगत नाही.
इतरांच्या सांगण्यावरून बँक खाते किंवा क्रिप्टोकरन्सी खाते उघडू नका.
ऑनलाईन ओळख झालेल्या प्रेमवीरांवर विश्वास ठेवून पैशांचे व्यवहार करू नका, जरी त्यांनी तुम्हाला आधी पैसे पाठवले असले तरी.
बक्षीस जिंकल्यास ते घेण्यासाठी स्वतःच्या खिशातून पैसे भरण्यास किंवा मिळालेल्या रकमेतून काही भाग पुढे पाठवण्यास नकार द्या.
जर तुम्हाला संशय आला की तुमच्या खात्याचा गैरवापर होत आहे, तर घाबरून न जाता तातडीने खालील पावले उचला :
ज्या व्यक्तीने तुम्हाला पैसे पाठवण्यास सांगितले आहे, तिच्याशी तत्काळ संपर्क तोडा.
लगेच आपल्या बँकेला या व्यवहाराबद्दल माहिती द्या आणि शक्य असल्यास आपले खाते बदला.
या घटनेची तक्रार राष्ट्रीय सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर किंवा हेल्पलाइन क्रमांक 1930 वर त्वरित नोंदवा.
आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळ्या सामान्य माणसाला ढाल बनवून आपले काळे धंदे चालवत आहेत. त्यामुळे, आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगणे आणि जागरूक राहणे हेच अशा प्रकारच्या फसवणुकीपासून वाचण्याचे सर्वात मोठे शस्त्र आहे. क्षणाचा मोह आयुष्यभराच्या त्रासाला कारणीभूत ठरू शकतो, हे नेहमी लक्षात ठेवा.