Parents Dispute Abuse
मित्राने आई-वडिलांवरून केलेली शिवीगाळ त्याच्या जिव्हारी लागली होती. त्याला तो कायमचा धडा शिकविण्यासाठी संधीची वाट पाहत होता. अखेर एकेदिवशी त्याला ती संधी मिळाली. दोघांनी त्या दिवशी मद्यप्राशन केले होते. मध्यरात्री तो जागा झाला. त्याने लोखंडी पहारेने मित्राच्या डोक्यात घाव घातले. काही वेळात मित्र निपचित पडल्याची खात्री केली. त्यानंतर पोलिसांना गुंगारा देण्यासाठी नामी शक्कल लढवली. त्याने सांगितले, साहेब दुचाकीवरून आलेल्या चौघांनी बेडशिट आणि गादीच्या कारणातून माझ्या मित्राचा खून केलाय, कसाबसा मी माझा जीव वाचवून पळालोय साहेब. त्याने दिलेल्या माहितीने पोलिस देखील चक्रावले. परंतु ही माहिती देताना तो गडबडत होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी त्याची गडबड अचूक हेरली अन् अवघ्या दोन तासांत खुनाच्या गुन्ह्याचा छडा लावत पोलिसांनी खुन्याला गजाआड केले.
पुणे शहरातील फुरसूंगी संमिश्र वस्ती असलेला उपनगराचा परिसर, पूर्वी हा भाग हडपसर पोलिस ठाण्याच्या अखत्यारीत येत होता. परंतु नव्याने झालेल्या फुरसुंंगी पोलिस ठाण्यात आता हा भाग येतो. शुक्रवारी रात्री सहायक पोलिस निरीक्षक विलास सुतार रात्रगस्त अधिकारी म्हणून कर्तव्यावर होते. शनिवारची पहाट झाली होती. 4 वाजून 52 मिनिटांनी पोलिस ठाण्याचा फोन खणाणला, हांडेवाडी रोड लगत असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये टेडीबिअर विकणार्या एका व्यक्तीचा दुचाकीवरून आलेल्या चौघांनी मारून खून केलाय. त्याच्या एका मित्राने पोलिस नियंत्रण कक्षाला ही माहिती दिली होती.
तत्काळ सुतार घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी रविकुमार यादव हा रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेला त्यांना दिसला. पोलिस नियंत्रण कक्षाला किसन सहा याने ही माहिती दिली होती. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली. त्यावेळी त्याने सांगितले, मी माझ्या पत्र्याच्या शेडमध्ये मोबाईलवर गेम खेळत होतो. पहाटेच्यावेळी दोन दुचाकीवरून चौघेजण आले. त्यांनी रविकुमारला बेडशीट आणि गादी दिली नाही म्हणून बेदम मारहाण केली. शेडचा पत्रा वाकवून ते आतमध्ये शिरले होते. मी वादात पडलो, परंतु त्यांनी माझ्यावर देखील हल्ला करण्याच प्रयत्न केला. मी कसाबसा आपला जीव वाचवून पोलिस चौकीकडे पळालो. त्यानंतर मी पोलिस नियंत्रण कक्षाला मदतीसाठी फोन केला होता.
पोलिसांनी घटनास्थळाचे अचूक निरीक्षक केले. किसन याने सांगिते होते की, मारहाण करणारे चौघेजण पत्रा वाकवून रविकुमारच्या शेडमध्ये शिरले. परंतु पोलिसांना बळाचा वापर करून पत्रा वाकविल्याचे निदर्शनास आले नाही. त्याने सांगितले, चौघे दुचाकीवर आले होते. पोलिसांनी त्या तीन तासांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले, त्यावेळी त्यांना चौघेजण बसून आलेल्या अशा कोणत्याही दोन दुचाकी त्या परिसरात दिसून आल्या नाही. सुतार यांना किसनच्या बोलण्यात काहीतरी काळं बेरं असल्याची चाहूल लागली होती. परंतु तूर्तास तरी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता. किसनला पोलिस ठाण्यात आणण्यात आले. आता तो वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्यासमोर उभा होता. पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी त्याच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. परंतु किसन मोठा तयारीचा होता, काही केल्याने तो पोलिसांसमोर बोलण्यास तयार नव्हता, तो आपण काहीच केले नसल्याचा कांगावा करत होता. मात्र कदाचित त्याला माहिती नसावे की, पोलिसांच्या केव्हाच लक्षात आले होते की त्यानेच रविकुमारचा काटा काढलाय म्हणून. अखेरचा पोलिसांनी डाव टाकताच तो त्यांच्या जाळ्यात अडकला, त्याने आपणच रविकुमारचा काटा काढल्याची कबुली दिली.