डी. एच. पाटील, म्हाकवे
ऐन उन्हाळा असल्याने शेतात लावलेल्या उसाला पाण्याची नितांत गरज होती. यात वीज बोर्डाकडून पहाटेचे लाईटचे वेळापत्रक ठरवले होते. याला शामची शेती अपवाद नव्हती. आज पहाटे चारपासून लाईट सुरू होणार असल्याने शामराव उसाला पाणी पाजण्यासाठी लवकरच आपल्या शेताकडे गेले होते. शेतामध्ये जाऊन ते वीज येण्याची वाट पाहात होते. पण सव्वाचार वाजले तरीसुद्धा लाईटचा पत्ता नव्हता. त्यामुळे त्यांनी वेळ काढण्यासाठी उसाच्या सभोवती बॅटरीच्या उजेडात फेरफटका मारायला सुरुवात केली. त्यांचा दोन एकर उसाचा डाग होता. त्यामुळे भरभर चालत ते वाट तुडवू लागले. फिरत फिरत उसाच्या पूर्वेकडील बाजूला आल्यानंतर त्यांना काहीसा कुचकट वास येऊ लागला. त्यांनी बोटाने नाक दाबून धरले व उसाच्या सरीमध्ये बॅटरीचा झोत टाकला. पण काही दिसेना. बॅटरीच्या उजेडात ते उसाच्या सरीमध्ये चालू लागले.
उसाचा सरीच्या मध्यंतरी आल्यानंतर त्यांना कोण्या एका महिलेचा मृतदेह अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेला दिसला. जंगली प्राण्यांनी मृतदेहाचे लचके तोडले होते. त्यामुळे द़ृश्य भयानक दिसत होते. त्यांना दरदरून घाम फुटला. त्यांच्या मनामध्ये भीती दाटून आली.
‘कसलं पाणी? डोंबलाचं... सगळं काम बोबललं’ म्हणत त्यांनी त्या शेतातून काढता पाय घेतला. आता अंधुकसं दिसू लागलं होतं. घरात येऊन त्यांनी पुन्हा हातपाय धुतले. कसंबसं स्वत:ला सावरत चहाचा गुटका घेतला व तडक जाऊन आपल्या शेतात पाहिलेली घटना त्यांनी गावच्या पोलिस पाटलांना जाऊन सांगितली. खात्री करून घेण्यासाठी पोलिस पाटील स्वतः मळ्यामध्ये आले. एव्हाना आता संपूर्ण उजाडलं होतं. त्यामुळे स्पष्ट दिसत होतं. पोलिस पाटील यांनी घटनास्थळी पाहणी केली. खरोखरच एका महिलेचा मृतदेह पडलेला दिसत होता.
पाटलांनी पोलिस स्टेशनला खबर दिली. खबर मिळताच इचलकरंजी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. गावातल्या बघ्यांचीही गर्दी शेतात जमू लागली. मृतदेहाचा पंचनामा करून पोस्टमार्टमसाठी मृतदेह पाठवण्यात आला. पोलिस जमलेल्या गर्दीतून मृत महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत होते. परंतु महिलेची ओळख पटत नव्हती. पोलिसांनी शेजारी पाजारी असणार्या वस्त्यांमध्ये संबंधित महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला; परंतु त्या महिलेची ओळख पटली नाही.
पोलिस घटनास्थळी काही सापडते का हे पाहात होते. पोलिसांना तपास करत असताना मृतदेहाच्या अंगावर भाजीपाल्याचे काही देठ दिसून आले. शामरावच्या शेताच्या आसपास ही भाजी आढळून आली आही. त्यामुळे भाजीपाल्याच्या देठावरूनच या महिलेची ओळख पटण्यास मदत होणार होती.
पोलिसांनी त्या महिलेची ओळख पटवण्यासाठी जवळपासच्या गावांमध्ये चौकशी सुरू केली. पोलिसांच्या खबर्यांना अलर्ट करण्यात आले. परंतु 24 तास उलटूनही तिची ओळख पटली नव्हती. त्यामुळे कोणत्या पोलिस स्टेशनला संबंधित वर्णनाची कोणी महिला बेपत्ता असल्याची फिर्याद नोंद आहे का, याची ते माहिती घेत होते. परंतु अशी कोणतीही फिर्याद नोंद झालेली नव्हती.
मृतदेहाच्या अंगावर भाजीपाल्याचे देठ आढळून आल्यामुळे पोलिसांनी आपला मोर्चा भाजी मंडईकडे वळविला. ज्या ज्या ठिकाणी आठवडी बाजार भरत होता, तेथे जाऊन पोलिस चौकशी करू लागले. भाजी मंडईत चौकशी करत असताना शहरालगतच्या एका गावात चौकामध्ये भाजीपाला विकणारी महिला गेल्या काही दिवसांपासून गायब असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. चौकशी करत पोलिस ती जिथे राहात होती तिथे पोहोचले. तिथे चौकशी केली असता ही महिला काही दिवसापासून बेपत्ता असल्याचे समोर आले.