डी. एच. पाटील, म्हाकवे
समुद्र आज चांगलाच खवळला होता. वारा जोरात असल्यामुळे समुद्राच्या काठाला असणारी नारळी-पोफळीची झाडे वार्याच्या झोकाने झोकांड्या देत होते. आज समुद्रावर फारसी वर्दळ नव्हती. समुद्राच्या लाटा पहाटेपासूनच काठाला धडकत होत्या. पावसाची रिपरिप सुरूच होती. आजही निवृत्त मेजर आनंदराव नेहमीप्रमाणे सकाळी सकाळी समुद्रावर फेरफटका मारण्यासाठी आले होते. हातामध्ये छत्री, पाऊचमध्ये मोबाईल आणि नेहमीची स्टीक घेऊन ते या पावसात समुद्राच्या काठावर फेरफटका मारत होते.
जवळपास चार ते पाच फेर्या मारून ते नेहमीप्रमाणे समुद्रा कडेच्या एका दगडाच्या बाजूला बसले. लाटांमधून उडणारे तुषार त्यांच्या अंगावर येत होते; परंतु त्याकडे दुर्लक्ष करत ते समुद्राकडे पहात होते. समुद्रात कोसळणारा पाऊस पाहत असताना न कळत त्यांचे लक्ष एका दगडाच्या कोपर्याकडे गेले. त्यांना पाण्याच्या लाटांवर काहीतरी तरंगताना दिसले. कुतुहलाने त्यांनी जवळ जाऊन पाहिले. तर एका लहान मुलीचा मृतदेह पाण्यावर तरंगत असलेला दिसला. शहानिशा करून त्यांनी जवळच्या अँटॉप हिल पोलिस स्टेशनला फोन केला.
घटनेची खबर मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. खवळलेला समुद्र आणि कोसळणारा पाऊस... या पावसातच पोलिस लहान मुलीच्या मृतदेहाचा पंचनामा करत होते. प्रथम मुलीची ओळख पटणे गरजेचे होते. पण, पोलिसांच्या मेसेजद्वारे सदरची मुलगी अँटॉप हिल परिसरातील असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी मृतदेहाच्या आजूबाजूला काही सापडते का हे पाहण्याचा प्रयत्न केला; परंतु मुसळधार पाऊस व खवळलेला समुद्र यामुळे पोलिसांच्या हाती तसे काही फारसे लागले नाही. मात्र प्रथमदर्शनी मुलीच्या मानेवर व्रण दिसत होते. त्यामुळे हा खुनाचा प्रकार असावा असा कयास बांधून पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला.
काही वेळाने रियाना शेख नावाची एक मध्यम वयाची महिला ओरडत-रडत त्या ठिकाणी आली. पोलिसांनी तिला धीर देऊन पोलिस स्टेशनमध्ये आणले. तिची रितसर फिर्याद घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला. गल्लीमध्ये, शेजापाजार्यांच्याकडे चौकशी करण्यात आली. परंतु त्या मुलीला काल सायंकाळ नंतर कोणीही पाहिले नव्हते. त्यामुळे पोलिसांना तपास करणे जिकरीचे झाले होते.
पोलिस तपास सुरू असताना प्रत्येक गल्ली-मोहल्ल्यामध्ये चौकशी करण्यात आली. त्याशिवाय रियानाचा पती रमजान याच्याकडेही चौकशी करण्यात आली. परंतु खुनाचा कसलाच धागादोरा लागत नव्हता. त्यातच पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मुलीचा गळा दाबून खुन करून समुद्रात फेकण्यात आल्याचे दिसून आले.
पोलिसांनी रियानाच्या घरापासून समुद्र काठापर्यंत असणारे आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. या अनुषंगाने तपासासाठी अनेकांना बोलावण्यात आले; परंतु त्यामधूनही काही निष्पन्न झाले नाही. तपास सुरू असताना पोलिसांना एक गुप्त माहिती मिळाली. रियाना व रमजान या दोघांचेही हे दुसरे लग्न होते. त्यामुळे दोघांच्यात नेहमी खटके उडायचे. पोलिसांनी त्या अनुषंगाने तपास करण्याचा निर्णय घेतला. चौकशीसाठी रमजानला पुन्हा ताब्यात घेतले.
पूर्वार्ध