सोलापूरचे प्रसिद्ध न्यूरो फिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येला दोन आठवडे उलटून गेले तरी या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना अद्यापही यश आलेले नाही. संशयाची सुई सतत इकडे तिकडे फिरत आहे. डॉक्टरांच्या आत्महत्येला नेमके कोण जबाबदार याबाबत नुसताच संशयकल्लोळ सुरू आहे. समाज माध्यमांवरही याबाबत नुसताच गदारोळ सुरू आहे. पण निष्कर्ष काही मिळेनासा झाला आहे..
Dr Valsangkar Death Case
न्यूरो फिजिशिअन स्व. डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येला पंधरा दिवस उलटून गेले आहेत. मात्र पोलसांच्या तपासाची चक्रे मनीषा मुसळे-मानेच्या भोवतीच फिरत आहेत. मध्यंतरी याप्रकरणी डॉक्टरांच्या स्नुषा डॉ. शोनाली यांच्या नावाभोवतीसुद्धा गूढ वलय निर्माण झाले होते. पण अद्याप तरी याबात पोलिसांच्या हाती ठोस काही लागलेले नाही. या प्रकरणात मनीषाशिवाय आणखी कुणी 'मास्टर माईड' आहे काय, याचा अजूनही उलगडा झालेला नाही. राज्यात गाजलेल्या या हायप्रोफाईल केसमध्ये पोलिस कुणाला वाचविण्याचा तर प्रयत्न करत नाहीत ना, असा सवालही आता सोलापूरच्या जनतेतून उमटत आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे सोपविण्याची मागणी सोलापूरकरांमधून होत आहे.
सोलापूरच नव्हे, राज्यात नामवंत न्यूरो फिजिशिअन म्हणून डॉ. शिरीष वळसंगकर यांची ओळख होती. त्यांच्या आत्महत्येनंतर राज्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली. त्यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीच्या आधारावर हॉस्पिटलमधील कर्मचारी मनीषा मुसळे-माने हिला अटक करण्यात आली. सध्या ती न्यायालयीन कोठडीत आहे. पोलिसांच्या तपासाची चक्रे केवळ आणि केवळ मनीषा भोवतीच फिरली. डॉ. शिरीष यांनी फक्त मनीषामुळे आत्महत्या केली या गोष्टीवर अनेकांचा आजही विश्वास बसायला तयार नाही. वळसंगकर कुटुंबातील अंतर्गत कलह, हॉस्पिटल मधील वर्चस्ववाद, आर्थिक गैरव्यवहार अशी अनेक कारणे पोलिसांच्या चौकशी दरम्यान पुढे आली. पण ठोस असा कोणताही निष्कर्ष पोलिस काढू शकलेले नाहीत.
सुरुवातीला काही दिवस डॉ. शिरीष यांच्या आत्महत्येच्या संशयाची सुई त्यांची सून डॉ. शोनाली हिच्याकडे वळू लागली. परंतु तिथपर्यंत तपास गेलाच नाही, असा स्थानिक जनतेचा दावा आहे. वळसंगकर कुटुंबीयातील सदस्यांची केवळ जुजबी चौकशीच झाली आहे. त्यांच्याकडे तपास करण्यासाठी ठोस अशी पावले उचलली गेली नाहीत, असे काहींचे म्हणणे आहे. मनीषाच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार मनीषाने केवळ तिची व्यथा ई-मेलद्वारे मांडली. या एका ई-मेलमुळे डॉक्टरांनी आत्महत्या केली हे न पटण्यासारखे आहे. त्यामुळे पोलिसांनी इतर कारणांचा शोध घ्यावा अशी मागणी आता लोकांमधून पुढे येत आहे. कुणी 'मास्टर माईड' आहे काय? गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे डॉक्टरांच्या घरी मोठ्या प्रमाणात कौटुंबिक कलह सुरू झाला होता. त्यामुळे डॉक्टर प्रचंड तणावाखाली होते आणि हा कौटुंबिक तणावच त्यांना आत्महत्येपर्यंत घेऊल गेला असे मनीषाचे म्हणणे होते. वळसंगकर कुटुंबात गृहकलह होता. त्यामुळे त्याचे प्रेशर डॉ. शिरीष यांच्यावर होते का? हॉस्पिटलमध्ये डॉ. शिरीष आणि सून डॉ. शोनाली यांच्यात वर्चस्वाची लढाई सुरू होती का, त्याचा या आत्महत्येशी संबंध आहे का? मनीषा यांनी केवळ व्यथा मांडली, या एका कारणावरून डॉक्टर आत्महत्या करू शकतात का? डॉ. शिरीष यांनी बाथरूममध्ये गोळी झाडून आत्महत्या केली. परंतु ते पिस्टल बेडरूमच्या बेडवर कसे मिळाले? डॉ. शिरीष यांनी लिहिलेल्या चिठ्ठीवरील सही त्यांची नाही हा दावा खरा की खोटा?... असे अनेक प्रश्न या निमित्ताने पुढे आले असून अद्याप त्याची उत्तरे मिळणे बाकी आहे.
डॉ. शिरीष यांनी आत्महत्या केली त्यावेळी घरामध्ये कोण कोण उपस्थित होते? डॉ. शिरीष यांना हॉस्पिटलमध्ये नेण्याअगोदरच त्यांच्यावर कुणी प्रथमोपचार केले? डॉ. शिरीष तसेच मनीषा यांच्याशिवाय इतरांच्या मोबाईलचे सीडीआर तपासण्यात आले आहेत का? असे अनेक प्रश्र अद्यापही अनुत्तरित आहेत. त्यामुळे हॉस्पिटलचे कर्मचारी, वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार यांनी देखील खऱ्या कारणाचा शोध घेण्याची मागणी लावून धरली आहे. परंतु पोलिस अद्यापही 'मास्टर माईंड 'पर्यंत पोहोचलेले नाहीत. मनीषा हिला तोफेच्या तोंडी देऊन पोलिस कुणाला वाचविण्याचा प्रयत्न करीत नाहीत ना, अशी शंका आता उपस्थित होऊ लागली आहे.
सुरुवातीपासूनच राज्यात चर्चेत असलेल्या या हायप्रोफाईल केसचा तपास गुन्हे शाखेकडे न देता सदर बझार पोलिसांकडेच ठेवला गेला. पंधरा दिवस उलटून गेले तरी पोलसांच्या तपासात ठोस असे काहीच हाती लागले नाही. प्रचंड हुशार, शांत आणि संयमी असलेल्या डॉ. शिरीष यांनी नेमकी आत्महत्या कोणत्या कारणासाठी केली, त्यांच्या आत्महत्येस नेमकं कोण जबाबदार यासह अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवावा, अशी मागणी सोलापुरातील वैद्यकीय क्षेत्रातून तसेच सोलापूरकरांमधून होत आहे.