मोहाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने मुंबई-आग्रा महामार्गावरून अफूची तस्करीवर कारवाई करत 24 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला Pudhari News Network
क्राईम डायरी

Dhule Crime | मुंबई-आग्रा महामार्गावर अफूची तस्करी उघड; 24 लाखांचा मुद्देमाल जप्त

धुळे | मोहाडी पोलीस ठाण्याच्या पथकाची कारवाई; राजस्थान येथील दोघांना अटक

पुढारी वृत्तसेवा

धुळे : मुंबई-आग्रा महामार्गावरून अफूची तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर मोहाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने केलेल्या कारवाईत सुमारे 24 लाख रुपयांचा मादक पदार्थ जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी राजस्थान येथील दोघांना अटक करण्यात आली असून, इनोव्हा कारसह एकूण 24 लाख 7 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मोहाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी सचिन वसंत वाघ, चेतन राजेंद्र झोळेकर आणि चालक मंगल धर्मदास पवार हे महामार्गावर गस्त घालत होते. त्याचवेळी अफूची तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती पाटील यांना मिळाली. त्यांनी तत्काळ गस्ती पथकाला संशयित वाहनाची माहिती देऊन कारवाईचे आदेश दिले.

गस्ती दरम्यान लळींग गावाजवळील इंडियन ऑईल पेट्रोलपंपाजवळ एक गोल्डन रंगाची इनोव्हा कार (MH 12 DY 5920) मालेगावच्या दिशेने जाताना आढळली. पोलिसांनी थांबवण्याचा इशारा दिल्यावर चालकाने कार थांबवण्याऐवजी यू-टर्न घेत धुळ्याच्या दिशेने पळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून कार सव्हीस रोडवर थांबवली. मात्र, चालक अंधाराचा फायदा घेत लळींग गावाच्या दिशेने पळून गेला. थोड्याच वेळात त्याला लळींग घाटात पकडण्यात आले. संशयित आरोपीचे नाव रमेश भवराराम विष्णोई (रा. हेमनगर, राजस्थान) असे असून, त्याच्या सोबत असलेल्या साथीदाराचे नाव महेश साहू (रा. खोखरीया, राजस्थान) असल्याचे उघड झाले.

वाहनाची झडती घेतली असता, त्यामध्ये 10 प्लॅस्टिकच्या गोण्या आढळून आल्या. त्यामध्ये एकूण 181.306 किलोग्रॅम वजनाच्या अफूच्या झाडांच्या सुकलेल्या टरफल्यांचा चुरा सापडला. या पदार्थाला तीव्र वास असून, तो मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणारा मादक पदार्थ असल्याचे स्पष्ट झाले. तस्करीसाठी ही सामग्री बाळगण्यात आली होती.

या कारवाईत इनोव्हा कारसह एकूण 24,07,530 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुंगीकारक औषधे आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 अंतर्गत कलम 8(क), 17(क) व भारतीय न्यायसंहितेच्या कलम 318(4) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT